काँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:30 IST2019-08-03T15:29:00+5:302019-08-03T15:30:12+5:30
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी आमदार विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

काँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरी
सांगली : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी आमदार विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षांकडून सुरू आहे. शुक्रवारी कॉँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यापूर्वी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
अर्ज दाखल झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस कमिटीमध्ये पार पडल्या. राज्याच्या प्रभारी सोनल पटेल, जिल्हा निरीक्षक, प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम, चिटणीस अलका राठोड, जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मुलाखतीस ते गैरहजर राहिले, माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी उमेदवारीही मागितली नाही, शिवाय मुलाखतीसाठीही ते गैरहजर होते. पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक ११ इच्छुक मिरज मतदारसंघात आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जयश्रीताई पाटील मुलाखतीवेळी पक्षाच्या विविध सेलसह महापालिकेतील नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही मुलाखत दिली. शहरात कॉँग्रेसचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
भाजप सरकारविरोधात अनेक आंदोलने केली असून त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून राजाराम देशमुख यांनी उमेदवारी मागितली. अॅड. सदाशिवराव पाटील यांच्या कार्यपध्दतीवर काही कार्यकर्त्यांनी तक्रार केली. जतमधून विक्रम सावंत यांनी उमेदवारी मागितली. मुलाखतीनंतर इच्छुक उमेदवारांचा अहवाल प्रदेश कॉँग्रेस कमिटीला सादर केला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चित होणार आहे.