सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ५४५ कोटींचा आराखडा - पालकमंत्री पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:50 IST2025-05-03T16:50:00+5:302025-05-03T16:50:19+5:30
सौर ऊर्जेवर सर्वाधिक भर

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ५४५ कोटींचा आराखडा - पालकमंत्री पाटील
सांगली : गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली. चालू आर्थिक वर्षात ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली असून, अनेक नाविन्यपूर्ण योजनांवर तो निधी खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. सांगलीतील पोलिस परेड ग्राउंड येथे आयोजित कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, डॉ. विजयकुमार शहा आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात महसूल विभागाकडून तहसील स्तरावर सातबारा पुस्तके, फेरफार पुस्तके व हक्क नोंद संचिका संकलनाची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पाच हजार ४३५ सात-बाराची पुस्तके, दोन हजार २६८ फेरफार पुस्तके व तीन लाख २२ हजार ७८५ हक्क नोंद संचिका तलाठी कार्यालयातून तहसीलदारांच्या अभिलेखात जमा केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जुने फेरफार व सात-बाराच्या नक्कल तहसील कार्यालयात तत्काळ मिळणार आहेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात १७२ शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. २०२३-२४ खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून साडेतीन लाख शेतकऱ्यांना १४१ कोटी ८४ लाख रुपये विमा भरपाई वाटप केले आहे. हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये १० हजार ६८७ शेतकऱ्यांना २९ कोटी ८५ लाख रुपये अनुदान दिले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये २०२४-२५ मध्ये ५६३ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.
सौर ऊर्जेवर सर्वाधिक भर
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात ४६ ठिकाणी एकूण ३१७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी प्रगतीपथावर आहे. त्यातील बसर्गी, जिरग्याळ (ता. जत), माडगुळे, लिंगीवरे (ता. आटपाडी) आणि मणेराजुरी (ता. तासगाव) येथील एकूण २७ मेगावॅट क्षमतेचे पाच प्रकल्प सुरू झाले आहेत.
यांचा झाला गौरव
राष्ट्रपती पदकाने सन्मानित महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायरमन कासाप्पा माने, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गौरवण्यात आलेले महानगरपालिकेचे सुनिल माळी, बाबूराव कोळी आणि राजेंद्र कदम, पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित सहा पोलीस अंमलदारांचाही सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते केला.
लक्षवेधी परेड संचलन
परेड संचलनात पोलिस, पोलिस बँड, श्वान, निर्भया, बीडीडीएस, अग्निशमन, दंगल नियंत्रक पथक आदी पथकांचा समावेश होता.