बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:38 IST2025-10-11T15:34:01+5:302025-10-11T15:38:19+5:30
बँकांमध्ये बचत, चालू व मुदत ठेव स्वरुपात हे पैसे पडून आहेत. तब्बल ७ लाख ७५ हजार ३१५ खातेदारांची ही रक्कम आहे, पण हे खातेदार गेल्या १० वर्षांपासून खात्याच्या चौकशीसाठी बँकेकडे फिरकलेही नाहीत.

बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
संतोष भिसे
सांगली : सांगली, मिरज शहरांसह ग्रामीण भागातील विविध बँकांमध्ये तब्बल १७६ कोटी रुपयांची रक्कम बेवारस स्थितीत पडून आहे. ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करुन पैसे घेऊन जावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
बॅंकांमध्ये बचत, चालू व मुदत ठेव स्वरुपात हे पैसे पडून आहेत. तब्बल ७ लाख ७५ हजार ३१५ खातेदारांची ही रक्कम आहे, पण हे खातेदार गेल्या १० वर्षांपासून खात्याच्या चौकशीसाठी बँकेकडे फिरकलेही नाहीत. खात्यामध्ये पैसे असूनही त्यामध्ये दशकभरात एकही व्यवहार झालेला नाही. हे खातेदार जिवंत आहेत की नाही याचीही माहिती बॅंकांना नाही. पैसे नेण्यासाठी स्वत: खातेदार किंवा त्यांचे नातेवाईक येत नसल्याने बॅंकांनी ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा केली आहे. खातेदारांनी किंवा त्यांच्या वारसांनी ३१ डिसेंबरपर्यंत बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
विविध बॅंकांतील बेवारस रकमा अशा
सर्वाधिक पैसे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत बेवारस अवस्थेत पडून आहेत. ही रक्कम तब्बल ७५ कोटी ७२ लाख रुपये इतकी आहे. पावणेचार लाख खातेदारांनी हे पैसे ठेवले असून गेल्या दशकभरात बॅंकेकडे ते फिरकलेच नाहीत.
बॅंक खातेदार रक्कम
जिल्हा मध्यवर्ती बॅंक ३ लाख ७२ हजार ८३८ ७५ कोटी ७२ लाख
बँक ऑफ इंडिया १ लाख ३१ हजार ९१८ ३३ कोटी ५४ लाख
स्टेट बँक ऑफ इंडिया ४४ हजार ९३९ १६ कोटी ९९ लाख
आयसीआयसीआय बँक ९६ हजार ९१७ १६ कोटी १५ लाख
बँक ऑफ महाराष्ट्र १ हजार ६१६ ८ कोटी ७७ लाख
युनियन बॅंक ३० हजार ७५ ७ कोटी ६५ लाख
रत्नाकर बँक २४ हजार ९६८ ५ कोटी ८० लाख
केवायसी द्या, पैसे न्या
केंद्र सरकारचा वित्त विभाग व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने ग्राहकांसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना हे पैसे काढून घेता येतील किंवा नुतनीकरण करून ठेवताही येतील. त्यासाठी बँकेत आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करावी लागेल.