आर. आर. पाटलांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:34 PM2020-02-16T18:34:47+5:302020-02-16T19:23:16+5:30

आर. आर. पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल.

R.R. Patil's Nirmal Place to be developed soon: Ajit Pawar | आर. आर. पाटलांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार

आर. आर. पाटलांचे निर्मलस्थळ लवकरच विकसित करणार- अजित पवार

Next

सांगली : आर. आर. (आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर नेत्याचे  समाधीस्थळ असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून ते विकसीत केले जाईल. या कामासाठीआवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, आर. आर. पाटील हे समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे नेते होते. सामान्य माणासाचे हित जोेपासून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळून त्या खात्यांची उंची वाढविली. 

आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यात यशस्वीपणे राबविले असल्याचे ते म्हणाले. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज पुरस्काराचे आबा पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हे पुरस्कार आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी वितरीत करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

आर. आर. पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल. सांगली जिल्ह्यातील सर्वच विकास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्या गावांना सिंचन योजनेचे पाणी पोहोचलेले नाही त्या गावांत पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमदार सुमनताई पाटील यांनी सुचविलेली सर्व कामे मंजूर केली जातील. या कामांना आवश्यक असणारा निधी प्राधान्याने दिला जाईल असेही अजित पवार म्हणाले. जिल्ह्यात टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ योजनेच्या कामांना आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी जलसंपदा विभागाला भरघोस निधी दिला जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.

आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमीत्त अंजनी येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अजित पवार यांनी अभिवादन केले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, माजी आमदार सदाशिव पाटील, अंजनी च्या सरपंच स्वाती पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: R.R. Patil's Nirmal Place to be developed soon: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.