येथील समिंद्रे यांचे डोंगर पायथ्याशी शेतजमीन व जनावरांची वस्ती असून दुपारी घरातील लोक वस्तीवरील कामे उरकून गावात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास या वस्तीवरून त्यांच्या छप्पर व गवताच्या गंजीस आग लागल्याचे त्यांना समजले. हे अंतर गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर असून समिंद्रे कुटुंबातील सदस्य व काही युवकांनी धाव घेतली. तोपर्यंत वस्तीवरील छप्पर व दोन गवताच्या गंज्या जळून खाक झाल्या होत्या.
येथील अमर तरुण गणेश मंडळातील युवक व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. छपरात अडकलेल्या गाय, म्हैस, दोन रेड्या व बैलास सोडता आले नाही. भाजल्यामुळे रामचंद्र समिंद्रे यांच्या मालकीची नऊ महिने गाभण असलेली गाय मृत्युमुखी पडली, तर म्हैस, दोन रेड्या व बैलास सुमारे पन्नास ते साठ टक्के भाजून अंगावर जखमा झाल्या आहेत.
दुपारी अडीच वाजता इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविण्यात आली.
कोणाच्याही अध्यातमध्यात नसलेल्या शेतीवर गुजराण करणाऱ्या कृष्णात समिंद्रे व रामचंद्र समिंद्रे कुटुंबावर झालेल्या आघातामुळे रेठरे धरण येथील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते.
मागच्या वर्षी जीवापाड जपलेली बैलजोडी गेली!
मागील वर्षीच्या उन्हाळ्यात याच ठिकाणी समिंद्रे यांचे छप्पर व गंज्या जळाल्या होत्या. तेव्हादेखील गोठ्यातील जनावरे भाजली होती. समिंद्रे यांनी जीवापाड जपलेली बैलजोडी आगीत भाजून महिन्यानंतर मृत्युमुखी पडली होती. यावेळी त्यांच्या घरातील महिला व पुरुष मंडळींना दुःख अनावर होऊन ते रडले होते. आज पुन्हा दुसऱ्या वर्षी अशीच घटना घडल्याने त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे.