‘रॉंगसाईड’ने वाहन चालवणे ठरु शकते जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:40+5:302021-06-28T04:18:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आल्यानंतर आता वाहनधारक पुन्हा सुसाट झाले आहेत. ...

Rongside driving can be life threatening | ‘रॉंगसाईड’ने वाहन चालवणे ठरु शकते जीवघेणे

‘रॉंगसाईड’ने वाहन चालवणे ठरु शकते जीवघेणे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आल्यानंतर आता वाहनधारक पुन्हा सुसाट झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या नियमांना हरताळ फासत वाहनचालक स्वत:सह इतरांच्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यातही ‘रॉग साईड’ने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे मोठ्या वाहनांसह पादचाऱ्यांनाही धोकाच निर्माण झाला आहे.

शहरातील प्रमुख मार्गासह उपनगरातील रस्ते पुन्हा एकदा गर्दीने फूलुन गेले आहेत. यात अनेकवेळा वाहनचालक चुकीच्या पध्दतीने वळण घेत आहेत. त्यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यात मोठ्या वाहनचालकांची चूक नसताना त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवळ प्रमुख मार्गावरच नव्हे तर शहरातील उपनगरातही असे प्रकार होत असल्याने आता चुकीच्या मार्गााने वाहन चालवून अपघात घडविणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. यात ‘रॉग साईड’ने ‘कट’ मारणाऱ्यांत तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

चौकट

शहरात याठिकाणी होते रॉग साईड

१) कर्मवीर चौक

शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या या चौकात काळ्याखणीकडून येणारे वाहनधारक चुकीच्या पध्दतीने सिव्हील हॉस्पिटल व जिल्हा परिषदेकडे वळण घेतात.

----

या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त असला तरी ते मिरज मार्गावर उभे असतात. त्यामुळे अशा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना अडचणी येतात.

---

तरीही आता पोलिसांनी या चौकातील सर्वच मार्गांवर होमगार्ड व वाहतूक पोलिसांची नियुक्ती करत रॉग साईडने जाणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.

२) कॉलेज कॉर्नर

जिल्ह्याचा बहुतांश भाग याच मार्गाने शहरात प्रवेश करत असल्याने या मार्गावर नेहमीच गर्दी ओसंडून वाहत असते.

---

या चौकात टिंबर एरियाकडून येणारे वाहनधारक तेथील आयलॅंडला वळसा न घालता धोकादायक पध्दतीने माधवनगरकडे वळण घेतात.

----

माधवनगरसह रतनशीनगर, आपटा पोलीस चौकीकडे जातानाही अनेक वाहनधारक रॉग साईडने जातात. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई सुरु आहे.

३) क्रांतिसिंह नाना पाटील चौक

सांगली-मिरज मार्गावर विश्रामबाग येथे असलेल्या या चौकातून जाणारे वाहनधारक थेट एकेरी मार्गावरुनच चुकीच्या पध्दतीने मार्ग बदलतात.

----

या चौकातून मिरजेकडे जाणारे अनेक वाहनधारकही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

----

या चौकातून पोलीस मुख्यालयाकडे येण्यासाठीही अनेकजण शॉर्टकट घेत असल्याने नेहमीच वाहनांच्या अपघाताच्या घटना होतात.

चौकट

रॉग साईडचा मोह; दंडाची पावती हजर

वाहतूक शाखेच्यावतीने चुकीच्या पध्दतीने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरुच ठेवली आहे. कोरोना संसर्गामुळे सध्या संपूर्ण शहरातील सिग्नल व्यवस्था बंद असली तरी वाहतूक शाखेच्यावतीने ठिकठिकाणी तपासणी नाके सुरु ठेवून रॉग साईडने वाहन चालविणाऱ्यांकडून दंडाची वसुली करण्यात येत आहे. वर्षभरात दीड लाखांहून अधिक दंड वसूल झाला आहे.

चौकट

२०२०मध्ये झालेले एकूण अपघात ५८८

मृत्यू २७९

जखमी २६०

कोट

शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना, एकेरी मार्गावरील वाहतूक व कोणीही रॉग साईडने वाहन चालवू नये, यासाठी कारवाई सुरु ठेवली आहे. त्यानुसार नियमांचा भंग केल्यास त्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

- प्रज्ञा देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: Rongside driving can be life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.