एसटीला टोलमाफी मिळणार! बचतीने प्रवाशी सुखावणार?; सांगली विभागाचे वार्षिक किती कोटी वाचणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:38 IST2025-09-19T17:37:36+5:302025-09-19T17:38:35+5:30

टोलमध्ये सवलत मिळाली तर एसटीचा मोठा खर्च वाचून बसेसच्या देखभालीसाठी शिल्लक रक्कम वापरता येईल

Road Transport Ministry is preparing to introduce a policy to provide toll concession to State Transport Corporation buses travelling on National Highways | एसटीला टोलमाफी मिळणार! बचतीने प्रवाशी सुखावणार?; सांगली विभागाचे वार्षिक किती कोटी वाचणार.. वाचा

एसटीला टोलमाफी मिळणार! बचतीने प्रवाशी सुखावणार?; सांगली विभागाचे वार्षिक किती कोटी वाचणार.. वाचा

प्रसाद माळी

सांगली : राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना टोलमध्ये सवलत देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय धोरण आणण्याच्या तयारी असल्याचे नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. हे धोरण आल्यास राज्यभरात एसटीचा टोलवर होणार खर्च वाचणार आहे.

सांगली विभागाने १० आगारांच्या बसेसच्या माध्यमातून मागील वर्षात विविध टोलसाठी १४ कोटी ७७ लाख रुपये मोजले होते. तर चालू वर्षात एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत सहा कोटी ६० लाख २० हजार ८३७ रुपये भरले आहेत. टोलमध्ये सवलत मिळाली तर एसटीचा मोठा खर्च वाचून बसेसच्या देखभालीसाठी शिल्लक रक्कम वापरता येईल.

सांगली विभागाच्या अनेक बसेस राज्य, तसेच राज्याबाहेरील विविध राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करतात. विशेषत: लांबपल्ल्याच्या बसेसना अधिक टोल भरावा लागतो. अत्यंत तुरळक टोल्सकडून सवलत दिली जाते. अन्यथा इतर अनेक टोलसाठी एसटीला संपूर्ण रक्कम भरावी लागते. एसटी आपल्या प्रवाशांना विविध सवलती देते.

त्यामध्ये महिला व ज्येष्ठांसाठी ५० टक्के सवलत, तर ७५ वरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवासाची सुविधा आहे. यासह विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा आहे. राज्यातील जनतेला सुरक्षितपणे माफक व सवलतीच्या दरात सेवा पुरविणाऱ्या एसटी बसेसला मात्र महामार्गांवरील टोलमध्ये सवलती मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. या टोलमध्ये एसटीला सवलत मिळाली तर शिल्लक राहणाऱ्या रकमेचा एसटीच्या देखभाल व अन्य खर्चासाठी वापर करता येणार आहे.

सांगली विभागातून टोलसाठी होणारा खर्च

एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ / खर्च

एप्रिल / १ कोटी ३५ लाख
मे / १ कोटी ५० लाख
जून / १ कोटी ४३ लाख
जुलै / १ कोटी १४ लाख
ऑगस्ट / १ कोटी २७ लाख
सप्टेंबर / ९५ लाख
ऑक्टोबर / १ कोटी ३४ लाख
नोव्हेंबर / १ कोटी २२ लाख
डिसेंबर / १ कोटी१२ लाख

२०२५ सालातील खर्च
जानेवारी / १ कोटी २१ लाख
फेब्रुवारी / १ कोटी ०६ लाख
मार्च / १ कोटी १८ लाख
एप्रिल / १ कोटी २४ लाख
मे / १ कोटी ५७ लाख
जून / १ कोटी ३६ लाख
जुलै / १ कोटी २० लाख
ऑगस्ट / १ कोटी २१ लाख

सवलत मिळणारे टोलनाके

टोलनाके / सवलत

वाशी / संपूर्ण टोलमाफी
मुलूंड / संपूर्ण टोलमाफी
दहिसर / संपूर्ण टोलमाफी
बोरगाव / ५० टक्क्यांची सवलत
तासवडे / ३० दिवसांत ५० फेऱ्यांचा मासिक पास
किणी / ३० दिवसांत ५० फेऱ्यांचा मासिक पास

सवलत न मिळणारे टोलनाके

आणेवाडी, खेड शिवापूर, तळेगाव, खालापूर, देहूरोड, मालेगाव, नाशिक सिन्नर, हिप्परगाव, इचगाव, अमालवाडी, माळीवाडी, वळसंग, आशिव, बनपिंपरी, चाळकवाडी, निमगाव, अनकढाळ, पारगाव, पन्नूर, फुलवाडी, मंगळगी, सावळेश्वर, कुसगाव, शेडूम, तळमोल, उंदरी, हत्तरगी, उनदेवाडी, कमकोळी, कोंगनोळी.

टोल सवलतीसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत होताे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने टोल सवलतीचे धोरण लवकर आणावे. टोल्सच्या सवलतीतून शिल्लक राहणारी रक्कम हे एसटीचे उत्पन्नच आहे. शिल्लक रक्कम बसेसच्या देखभाल, दुरुस्ती व प्रवाशांना अन्य सुविधा देण्यासाठी उपयोगात आणता येईल. - सुनील भोकर, विभाग नियंत्रक, सांगली.

Web Title: Road Transport Ministry is preparing to introduce a policy to provide toll concession to State Transport Corporation buses travelling on National Highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.