रेठरे धरण गावचे माजी सरपंच दत्तू ज्ञानू पाटील-पैलवान आनंदराव काकांचे वडील. त्यांच्या निधनानंतर १९९२ मध्ये तरुणपणात असणाऱ्या आनंदराव पाटील यांच्यावर कुटुंबासह आजवर माहीत नसलेल्या राजकारणाचीही जबाबदारी पडली; परंतु पहिल्यांदा आपली आर्थिक स्थिती मजबूत झाली पाहिजे, या विचारातून त्यांनी वडिलांनी सुरू केलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात लक्ष घातले. व्यवसायात भरभराट केली तसेच शेतीकडेही लक्ष दिले.
१९९५ मध्ये त्यांनी आपले लहान बंधू दादासाहेब पाटील यांच्या साथीने ट्रान्सपोर्ट व्यवसायाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले. यामुळे गाव व परिसरातील शंभरावर तरुणांना काम मिळाले. हळूहळू २००० सालानंतर राजकारणात सक्रिय झाले. पुणे राजारामबापू साखर कारखान्याचे संचालकपद मिळाल्यानंतर त्यांनी राजारामबापू उद्योग समूहात गावातील व परिसरातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील सुमारे दोनशेहून अधिक तरुणांना नोकरी मिळवून दिली. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हातभार लावला.
रेठरे धरण ग्रामपंचायतीत पॅनेल निवडून आणून त्यांनी मागासवर्गीय, तसेच माळी समाजातील व सर्वसाधारण समाजातील व्यक्तींना सरपंच पदाची संधी दिली. स्वतः गावाचे सरपंचपद भूषवून गावातील विकासकामांना गती दिली. गावात व्यवहार करण्यासाठी बँक नव्हती. १९९५ साली काकांनी गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक साक्षर केले. गावातील रस्ते, नाले, बोळ काँक्रिटीकरण, सुशोभिकरण आदी कामे करून कामाची चुणूक दाखविली.
कारखान्याचे संचालक पद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी व युवकांना विविध महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी सहाय्य केले. हाेतकरु मुलांना फी भरण्यासाठी मदत केली, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. शेतातील पिकांना पाणी मिळावे, यासाठी गावात सुमारे ११० विहिरी जवाहर रोजगार योजनेतून मंजूर करून खोदल्या, घर नसलेल्या सुमारे १३० कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून राहण्यासाठी घरे बांधून दिली.
गावातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन प्राथमिक उपकेंद्र बांधण्यासाठी पुढाकार घेतला. राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून गावात दोन व्यायामशाळा उभारण्यात आल्या. गावचे ग्रामदैवत असलेल्या जोतिबा मंदिराचे भव्य बांधकाम व जीर्णोद्धार, रेणुका मंदिर, दुर्गामाता मंदिर, सिद्धेश्वर मंदिर उभारण्यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. देखणी मंदिरे उभी केली. रेठरे धरण पाणलोट क्षेत्र व ओढ्यावर त्यांच्याच पाठपुराव्याने सुमारे पन्नासहुन अधिक बंधारे बांधले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.
गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोरणा धरण शिराळा-पाडळी येथून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर पाइपलाइन करून आणली. राष्ट्रीय पेयजल योजनेतून चार कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना आनंदराव काका यांनी पूर्णत्वास नेली.
जवळचे नातलग असलेले राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील-साहेब यांना आपले दैवत व गुरू मानत आनंदराव पाटील यांनी नेहमीच त्यांचा आदर केला, तसेच आमदार मानसिंगराव नाईकभाऊ यांच्या माध्यमातूनही आनंदराव पाटील काकांनी विविध कामे खेचून आणत गावचा विकास साधला. यातच त्यांचा उमदेपणा दिसून येत होता. त्यांच्या अपघाती निधनाने गावच्या विकासात कधीही भरुन न येणारी पाेकळी निर्माण झाली आहे.
- मानाजी धुमाळ, रेठरे धरण.