Resolution of mistrust against local woman sarpanch of Kande | लोकनियुक्त महिला सरपंचांविरुद्ध प्रथमच अविश्वास ठराव, कांदे येथे रांगेने मतदान
लोकनियुक्त महिला सरपंचांविरुद्ध प्रथमच अविश्वास ठराव, कांदे येथे रांगेने मतदान

ठळक मुद्देकांदे येथील लोकनियुक्त महिला सरपंचांविरुद्ध अविश्वास ठरावग्रामसभा, रांगेने मतदानास सुरुवात

विकास शहा

शिराळा  :  कांदे( ता.शिराळा) येथील महिला सरपंच यांच्या पतीचे ग्रामपंचायत कामकाजात अनाधिकृतपणे हस्तक्षेप, सदस्यांना विश्वासात घेऊन काम न करणे आदी कारणावरून उपसरपंच यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास ठरावाला संमती देण्याबाबत आज मोठया उत्साहात ग्रामसभा व मतदानास सुरुवात झाली आहे.

यामध्ये गुप्तमतदानाद्वारे ठराव मंजूर-नामंजूर मतदान होणार असून सायंकाळी ५ नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही ग्रामसभा गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल , तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर १२ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. गावामध्ये ४ प्रभाग आहेत, त्यामुळे ८ मतदानकेंद्रावर मतदान सुरू आहे.

गुरुवार दि १२ डिसेंबर रोजी लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंच शशिकांत पाटील तसेच सदस्य विश्वास पाटिल, संग्रामसिंह पाटील, गजानन पाटील, विश्वनाथ पाटील, अर्चना पाटील, माधुरी पाटील, मनीषा कुंभार, अर्चना कुंभार, विमल कुंभार, व शशिकला कांबळे यांनी अविश्वास ठराव मांडला.

सरपंच मनमानी कारभार करत आहेत, कोणत्याही सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत, सरपंच कर्त्यव्यात कसूर करतात व सरपंच यांचे पती अनधिकृतपणे ग्रामपंचायतच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात, गावाच्या विकासात निरुत्साह दाखवतात तसेच धनादेश जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवतात, त्यामुळे अविश्वास ठराव मांडू इच्छितो असे तहसीलदार गणेश शिंदे यांना कळविले होते. ग्रामपंचायत सदस्यांची खास सभा पार पडली. यामध्ये हा ठराव ११ विरुद्ध १ मंजूर करण्यात आला होता.

या ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी भाजप व काँग्रेस युतीचे ८ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत व सरपंच पाटील याही भाजप मधून निवडून आल्या आहेत. सरपंच अविश्वास ठरावसाठी सर्व जण एकत्र आले आहेत.

  • प्रभाग १-९००
  • प्रभाग २- ८१२
  • प्रभाग ३-९२२
  • प्रभाग ४- ११३४

असे एकूण ३ हजार ७६८ मतदार आहेत. यामध्ये १९८८ पुरुष १७८० स्त्री मतदार आहेत. ८ मतदान केंद्र व ४० अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Resolution of mistrust against local woman sarpanch of Kande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.