वांगीत बरखास्तीचा ठराव; वशी-कुरळपला खडाजंगी
By Admin | Updated: January 28, 2015 01:02 IST2015-01-28T00:27:51+5:302015-01-28T01:02:02+5:30
ग्रामसभा वादळी : भंगारविक्री व जलवाहिनीमध्ये गैरव्यवहाराचा वांगी ग्रामस्थांचा आरोप

वांगीत बरखास्तीचा ठराव; वशी-कुरळपला खडाजंगी
वांगी : वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भंगार विक्री व जलवाहिनी प्रकरणात अनागोंदी कारभार केल्याचा आरोप करीत, ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.
येथे २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अरूण पाटणकर होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सखाराम सूर्यवंशी, पांडुरंग पोळ उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी आरोप केला की, ग्रामपंचायतीने जुनी लोखंडी जलवाहिनी काढून नवी बसवली. जुनी लोखंडी जलवाहिनी व अन्य भंगार साहित्याची कोणतीही निविदा न काढता परस्पर विक्री केली. नवीन जलवाहिनी खरेदीत किमतीतही तफावत दिसत आहे. यामुळे संपूर्ण व्यवहाराची नि:पक्षपाती चौकशी व्हावी व ही ग्रामपंचायत त्वरित बरखास्त करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणेच उसास दर द्यावा, या मागणीचा आणि गावात असणारे बिअर बार व देशी दारूचे दुकान बंद करून संपूर्ण गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला. ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करावे, यासह अन्य ठरावही झाले.
सरपंच मनीषा कांबळे, उपसरपंच राहुल होनमाने, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, अमोल मोहिते, सुदाम सूर्यवंशी, सूर्योदय सूर्यवंशी, रमेश एडके, दिलीप पाटील, सतीश तुपे, अधिक कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)
कुरळप : वशी व कुरळप (ता. वाळवा) येथील ग्रामसभेत वादावादी झाली. या ग्रामसभा गोंधळातच पार पडल्या. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली.
वशी येथे ग्रामसभेत राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामावरुन गोंधळास सुरुवात झाली. ग्रामस्थांनी कंत्राटदारास बोलावून निकृष्ट कामाबाबत विचारणा व्हावी, अशी मागणी केली. परंतु सत्ताधाऱ्यांनी, त्याला मार्चअखेर मुदतवाढ द्यावी, असा आग्रह धरल्याने जोरदार वादावादी झाली. अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी दाखल व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे वादास तोंड फुटले. अर्ध्यातून सभा सोडून जात असताना ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना अडवून, लोकांचे प्रश्न मांडू द्यावेत, अशी मागणी केली.
सत्ताधारी निघून गेल्यानंतर उरलेल्या १२५ ते १५0 जणांनी प्रतिग्रामसभा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. शासकीय कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले नसल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, असा ठराव मंजूर झाला.
ग्रामसेवक डी. पी. सिंग म्हणाले, सरपंच जगन्नाथ पाटील यांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर स्वप्निल व सुनील पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मला आमचे प्रश्न मांडायचे आहेत म्हणून धक्काबुक्की व दमदाटी केली व सरकारी कामात अडथळा आणला.
कुरळप येथील ग्रामसभेत तंटामुक्तीचे अध्यक्ष बदलण्याच्या मुद्यावरुन गोंधळ उडाला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. काहीजणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)