सांगलीतील वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी अखेर रद्द, सहकार आयुक्तांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:39 IST2025-08-06T13:38:15+5:302025-08-06T13:39:20+5:30
जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आदेश दिल्याची चर्चा रंगली

संग्रहित छाया
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेची नोंदणी अखेर रद्द करण्यात आली आहे. सहकार आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची कस्टोडियन म्हणून नियुक्ती केली असून बँकेचे अस्तित्व लवकरच संपणार आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांची नेमणूक शासनाने केली होती. २००९ मध्ये लेखा परीक्षणात गैरव्यवहार उघडकीस आले. संचालकांनी नियमबाह्य कर्ज वाटप करून ३५० कोटींचे नुकसान केल्याचा ठपका होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने २०१० मध्ये परवाना रद्द केला. सहकार विभागाने अवसायक नेमला होता.
अवसायकांच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे. मुख्य इमारतीची १५ गुंठे जागा बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकल्याची तक्रार आहे. एका अवसायकाने सव्वा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका असूनही वसुली झालेली नाही. सध्या बँकेकडे १५५ कोटींच्या ठेवी, तर १६५ कोटींची कर्जवसुली आहे. मोठ्या कर्जदारांकडून वसुली बाकी आहे.
आर. डी. रैनाक यांच्या चौकशीत २० संचालक, दोन अधिकाऱ्यांवर १९५ कोटींच्या नुकसानीचा ठपका ठेवण्यात आला आहे. वसुलीचे आदेश दिले असले तरी अंमलबजावणी धीम्या गतीने सुरू आहे. आता तर वसंतदादा शेतकरी बँकेची शासनाने नोंदणीच रद्द केली आहे. तसेच दोन वर्षासाठी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची कस्टोडियन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
जयश्री पाटील यांच्या प्रवेशानंतर प्रक्रिया चालू
वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी रद्दबाबतचा आदेश आठ दिवसांपूर्वी झाला. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आदेश दिल्याची चर्चा रंगली आहे. नोंदणी रद्द झाल्यानंतर दोषी संचालकांवरील कारवाईचे पुढे काय होणार, अशी चर्चा वसंतदादा बँकेच्या सभासदांमध्ये रंगली आहे.
मुख्य मुद्दे
- चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आणला घोटाळा उजेडात
- ३५० कोटींचा गैरव्यवहार, संचालक जबाबदार
- मुख्य इमारत कमी दरात विकल्याची तक्रार
- ठेवीदारांचे १८९ कोटी विमा रकमेतून परत
- वसुलीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण