मध्यरात्री ‘महसूल’ची हप्ते वसुली जोरात
By Admin | Updated: September 1, 2015 22:29 IST2015-09-01T22:29:40+5:302015-09-01T22:29:40+5:30
वाळवा तालुक्यातील चित्र : वाळू ठेकेदारांची लूट

मध्यरात्री ‘महसूल’ची हप्ते वसुली जोरात
अशोक पाटील - इस्लामपूर वाळवा तालुक्याचा महसूल विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. आता नवीन आलेल्या निवासी नायब तहसीलदार आणि वाहनचालकाने नवीनच प्रताप सुरू केले आहेत. मध्यरात्री महामार्गावरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून ते हजारो रुपयांची हप्ते वसुली करत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत शिये (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील वाळू वाहतूकदार कृष्णात धोंडिराम वरुटे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीनंतर प्रांताधिकारी विजय देशमुख यांनी स्वत:च्या अखत्यारीत ट्रक सोडून दिला आहे.
याबाबत कृष्णात वरुटे यांनी अर्जात म्हटले आहे की, ३१ आॅगस्टरोजी मी ट्रकमधून (क्र. एमएच ११ एएल १२४) कऱ्हाड तालुक्यातून वाळू घेऊन कोल्हापूरकडे निघालो होतो. रात्री बाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येलूर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत निवासी नायब तहसीलदार विपीन लोकरे व वाहन चालक वैभव चमकले या दोघांनी माझी गाडी अडविली. यावेळी दोघांनी माझ्याकडे ७0 हजार रुपयांची मागणी केली. माझ्याकडे पैसे नसल्याने दुसऱ्याकडून उसने घेऊन मी दहा हजार रुपये दोघांना दिले. त्यावेळी माझी गाडी सोडण्यात आली. परंतु पुन्हा माझ्या गाडीचा पाठलाग सुरू केला. शिये येथे ट्रकला गाठले. यावेळी पुन्हा निवासी नायब तहसीलदार लोकरे यांनी कारवाईची धमकी देत पैशाची मागणी केली. पैसे नाहीत असे सांगताच, ट्रकसोबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात आणले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर लोकरे यांनी खोटा गुन्हा दाखल करुन १४ वर्षे खडी फोडण्यास पाठवतो, असा दमही दिला.
इस्लामपूर पोलीस ठाण्यात आल्यावर लोकरे यांनी, माझ्या अंगावर गाडी घातलीस, सोन्याची चेन, अंगठी काढून घेतलीस, असे खोटे आरोप करून इस्लामपूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु शहानिशा केल्यानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत ठरवू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. दरम्यान, रात्री लोकरे यांनी १२ ते १५ जणांना अडवून प्रत्येकी २0 ते २५ हजार रुपये घेतल्याचे वरुटे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. तक्रारीनंतर प्रांताधिकारी देशमुख यांनी ट्रक सोडून दिला.
याबाबत प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या तक्रारीची दखल घेऊ. लोकरे व वाहनचालक चमकले सांगली येथे कामानिमित्त गेले आहेत. बुधवारी दोघांची चौकशी करू. यामध्ये ते दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करू.
कारवाईवेळी पोलीस असणे गरजेचे
ज्यावेळी महसूल खात्याला कोणतीही कारवाई करायची असेल, तेव्हा पोलिसांना सोबत घेणे गरजेचे आहे. परंतु लोकरे यांनी आम्हाला काहीही न कळवताच राष्ट्रीय महामार्गावर जाऊन वाळू वाहनांवर कारवाई केली. याबाबत आम्हाला कसलीही कल्पना नाही, अशी माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.