महापालिकेतील काँग्रेसमध्ये बंडाळी

By Admin | Updated: January 28, 2015 00:57 IST2015-01-27T22:44:37+5:302015-01-28T00:57:28+5:30

महापौर, उपमहापौर निवड : वसंतदादा-कदम गटात संघर्षाची ठिणगी, सदस्य संभ्रमात

The rebellion in the municipal Congress | महापालिकेतील काँग्रेसमध्ये बंडाळी

महापालिकेतील काँग्रेसमध्ये बंडाळी

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीला आज, मंगळवारी नाट्यमयरित्या राजकीय वळण लागले. सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी महापौर पदासाठी विवेक कांबळे व उपमहापौर पदासाठी प्रशांत पायगोंडा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असताना, शेवटच्याक्षणी उपमहापौर पदासाठी आ. पतंगराव कदम गटाकडून काँग्रेसच्या वंदना कदम यांनी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली. त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली होती. महापौर पदासाठी तीन, तर उपमहापौर पदासाठी चार अर्ज दाखल झाले असून, निवडीची प्रक्रिया ३१ रोजी होणार आहे.
महापौर पदासाठी काँग्रेसकडून विवेक कांबळे, राष्ट्रवादीतून शेडजी मोहिते, स्वाभिमानी आघाडीतून बाळू गोंधळी यांनी, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून प्रशांत पाटील, वंदना कदम, राष्ट्रवादीतून राजू गवळी व स्वाभिमानीतून शिवराज बोळाज यांनी आज, मंगळवारी अर्ज दाखल केले. पालिकेत काँग्रेसचे पूर्ण बहुमत असून ४२ सदस्य आहेत. तसेच राष्ट्रवादीचे २५ व स्वाभिमानीचे ११ सदस्य आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत चांगलाच रंग भरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महापौर व उपमहापौर निवडीवरून पालिकेत मोठा खल सुरू आहे. महापौर पदासाठी विवेक कांबळे यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. त्यात मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांनी हक्क सांगितल्याने रंग भरला होता. तसेच उपमहापौर पदासाठी सत्ताधारी गटात मोठी चुरस होती. प्रशांत पाटील, वंदना कदम, अनारकली कुरणे, अलका पवार अशी अनेक नावे चर्चेत होती.
काल, सोमवारी सायंकाळी मदन पाटील यांनी कळंबीतील फार्म हाऊसवर नगरसेवकांची बैठक घेतली. प्रत्येक नगरसेवकाचे स्वतंत्ररित्या मत ऐकून घेतले. आज, मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. सकाळपासून इच्छुक पालिकेत ठाण मांडून होते. गटनेते किशोर जामदार सातत्याने मदन पाटील यांच्या संपर्कात होते. दुपारी चार वाजता मदन पाटील यांचे स्वीय सहायक सतीश हेरवाडे हे बंद लिफाफा घेऊन पालिकेत आले. त्यानंतर स्थायी समितीच्या सभागृहात सत्ताधारी गटाची बैठक झाली. या बैठकीत मदन पाटील यांच्या पत्राचे सामूहिक वाचन करण्यात आले. पाटील यांनी महापौर पदासाठी विवेक कांबळे व उपमहापौर पदासाठी प्रशांत पायगोंडा पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर काँग्रेसने या दोन्ही उमेदवारांचे अर्ज शेवटच्याक्षणी दाखल केले.
याच सुमारास काँग्रेसच्या वंदना कदम यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्ताधारी गटाच्या भुवया उंचाविल्या. पतंगराव कदम यांनी सकाळीच दूरध्वनीवरून अर्ज दाखलची सूचना केल्याचा दावा कदम यांनी केला. त्यांच्या या दाव्याने सत्ताधारी गटातील संघर्ष चव्हाट्यावर आला असून, काँग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे दिसू लागली आहेत. कदम यांच्या अर्जावर अतहर नायकवडी व अश्विनी कांबळे या नायकवडी गटातील सदस्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या आदेशाने अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सकाळीच दूरध्वनीवरून सूचना केली होती. पालिकेत आल्यानंतर दुसऱ्याचे नाव जाहीर झाल्याचे कळले. अजूनही आपण आशावादी आहोत. कदम व मदन पाटील यांनी आदेश दिल्यास अर्ज मागे घेऊ. आपण कोणाच्याही संपर्कात नसून, अर्ज दाखल करणे म्हणजे बंडखोरी नव्हे. दोन्ही नेत्यांत एकमत झाले नसेल. आता ते एकत्रित चर्चा करून निर्णय घेतील.
- वंदना कदम, काँग्रेस

चमत्काराचा दावा फोल : जामदार
मदन पाटील व पतंगराव कदम यांच्या आदेशाने अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसमध्ये कोणी नाराज असेल तर, त्यांची नेतेमंडळी समजूत काढतील. राष्ट्रवादीचा चमत्काराचा दावा ३१ रोजी फोल ठरेल. राजकारणात सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात. ज्या-त्यावेळी त्या घडतात, अशी सूचक प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांचे गटनेते किशोर जामदार यांनी दिली.


राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी शेडजी मोहिते व उपमहापौर पदासाठी राजू गवळी यांचे, तर स्वाभिमानी आघाडीकडून बाळू गोंधळी व शिवराज बोळाज यांचे अर्ज दाखल झाले.


चमत्कार घडवू : सूर्यवंशी
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. या निवडीत आम्ही निश्चित चमत्कार घडविणार आहोत. काँग्रेसचे १५ नगरसेवक संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एकसंध असून, आम्ही आशावादी आहोत, असे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.


व्हीपचा बडगा
काँग्रेसमधील बंडाळी व स्वाभिमानीतील भाजप व शिवसेना संघर्ष पाहता यंदा दोन्ही पक्षांकडून व्हीप बजाविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. गटनेते किशोर जामदार यांनी व्हीप बजाविला जाणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसमध्येच बंडखोरी झाल्याने सदस्यांवर व्हीपचा बडगा उगारला जाणार आहे. स्वाभिमानीत विधानसभा निवडणुकीवेळी भाजप व शिवसेना अशी उभी फूट पडली होती. त्यामुळे भाजपला मानणारे सदस्य वेगळी भूमिका घेऊ नयेत, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.


खास दूत धाडला
दीड वर्षापूर्वी स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेस नगरसेवकांत मोठी नाराजी पसरली होती. यावेळीही सदस्यांची नाराजी टाळण्यासाठी मदन पाटील यांनी खास दूतामार्फत बंद लिफाफ्यातून महापौर व उपमहापौरांची नावे दिली. त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश हेरवाडे यांनी हा लिफाफा सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत गटनेते किशोर जामदार यांच्याकडे सुपूर्द केला. नगरसेवकांसमोरच मदन पाटील यांच्या पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. या पत्रात सर्वाधिक नगरसेवकांनी विवेक कांबळे व प्रशांत पाटील यांच्या नावाला पसंती दिली असून, त्यांचे अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Web Title: The rebellion in the municipal Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.