इडलीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा, सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:02 IST2025-08-30T13:01:51+5:302025-08-30T13:02:46+5:30

वकिलांनी केली अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार

Rat feces found in idli in Sangli Complaint to the Food and Drug Administration Department | इडलीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा, सांगलीतील घटना

इडलीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा, सांगलीतील घटना

सांगली : सांगलीतील कॉलेज कॉर्नरला असलेल्या फ्रेंचाइजी घेतलेल्या इडली सेंटरमधून खरेदी केलेल्या इडलीमध्ये चक्क उंदराची विष्ठा (लेंड्या) आढळून आल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी घडला. याबाबत ॲड. दत्तात्रय जाधव यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली आहे.

कॉलेज कॉर्नरला असलेल्या इडली सेंटरमधून शुक्रवारी सकाळी ॲड. जाधव यांनी एक रेग्युलर इडली व एक बटण इडली पार्सल ९५ रुपयांना घेतले. घरी जाऊन इडलीचे पॅकेट उघडले असता त्यांना बटण इडलीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. त्यांनी इडली सेंटरमध्ये जाऊन मालकाला इडली दाखवून खडसावले. मालकाने चूक मान्य केली व इडलीचे पैसे परत देण्याचे मान्य केले.

परंतु, समाजहिताच्या दृष्टीने पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी ॲड. जाधव यांनी या प्रकाराबद्दल साहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. इडली सेंटरमध्ये स्वच्छता न करता, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी न घेता इडली बनवून दिली जाते. तसेच तेथे खायलादेखील दिली जाते. आठ दिवसांत संबंधित इडली सेंटर चालकावर अन्न भेसळ कायद्यानुसार कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तक्रारीद्वारे दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Rat feces found in idli in Sangli Complaint to the Food and Drug Administration Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.