सांगली जिल्ह्यातील काही भागात कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 17:51 IST2021-11-14T17:46:15+5:302021-11-14T17:51:34+5:30
सायंकाळच्या सुमारास सांगली परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. शिराळा तालुक्यात कोकरुड, चरण परिसरात रिमझिम पाऊस झाला.

सांगली जिल्ह्यातील काही भागात कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी
सांगली - दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागात पावसाने हजेरी देखील लावली आहे. यानंतर आज सायंकाळच्या सुमारास सांगली परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. शिराळा तालुक्यात कोकरुड, चरण परिसरात रिमझिम पाऊस झाला.
बदलत्या वातावरणामुळे दुपारच्या सुमारास काहीशी गरमी जाणवत होती. नंतर मात्र काही भागात पावसाच्या रिमझीम सरी कोसळल्या. ऐन गुलाबी थंडीच्या महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने हवेतील गारवा नाहिसा झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने हवेत पुन्हा गारवा निर्माण होत आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी कधी थंडी त कधी गरमीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला यासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
कोकणातील चिपळूण परिसरात आज दुपारीच मुसळधार पाऊस कोसळला. तर काल, शनिवारी कोल्हापूर शहरातही पावसाने हजेरी लावली होती. सध्या खरिपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. मात्र, हा पाऊस रब्बी पिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
१४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.