तासगाव : परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पीक छाटणीनंतर बहरलेल्या द्राक्षबागा वाचवण्यासाठी रात्रंदिवस औषध फवारणी करून मेहनत केली. मात्र बहुतांश द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनपेक्षित पावसामुळे अतिरिक्त औषध फवारणीचा सुमारे दोनशे कोटींचा भुर्दंड सहन करूनही अनेक द्राक्षबागा सोडून देण्याची वेळ आली आहे. याचा विपरित परिणाम द्राक्ष हंगामावर होणार आहे.जिल्ह्यात तब्बल एक लाख एकर द्राक्षक्षेत्र आहे. त्यापैकी सप्टेंबर महिन्यात ५० टक्के द्राक्षबागांची पीक छाटणी घेण्यात आली होती. लवकर छाटणी घेतल्यानंतर, द्राक्षाला चांगला दर अपेक्षित असतो; यामुळे बागायतदार सप्टेंबरमधील छाटणीला प्राधान्य देतात. मात्र यंदा परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यात छाटणी घेणाऱ्या द्राक्षबागायतदारांचे सर्वच गणित चुकवले.
गेल्या आठवड्यात दुष्काळी पट्ट्यासह जिल्हाभर सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसाने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायतदारांचे अर्थकारण कोलमडले आहे. दावण्यासह अनेक रोगांनी द्राक्षबागा वेढल्या आहेत. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागांत घडकूज झाली आहे. मणी तयार झालेल्या बागांची मणीगळ झाली आहे. यामुळे बागायतदार सैरभैर झाले आहेत.पावसाने होणारे नुकसान थोपवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रं-दिवस औषध फवारणीचा मारा केला. द्राक्षबागेत गुडघाभर, काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले होते. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या जिकिरीने औषध फवारणीचा धडाका लावला.
अनेकदा औषध फवारणीनंतर लगेचच पाऊस आल्याने एका-एका दिवशी दोन ते तीनवेळा औषध फवारणी करून द्राक्षे वाचवण्याची धडपड सुरू होती. एका आठवड्यात एक एकर द्राक्षबागेसाठी सरासरी ४० हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड शेतकºयांना सोसावा लागला आहे.छाटणी झालेल्या ५० हजार एकर क्षेत्रासाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांचा चुराडा झाला. इतके करूनही बहुतांश द्राक्षबागांचे नुकसान थांबवण्यात अपयश आले आहे. वर्षभर बाग जतन करून, ऐन फळधारणेच्या हंगामात पावसाने झोडपून काढल्याने अनेक बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्षबागायतदारांकडून होत आहे.