राजकीय पदाधिकाऱ्याच्या व्यवसायावर सांगलीत छापे, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:28 IST2025-09-12T14:28:28+5:302025-09-12T14:28:50+5:30
बोगस बिलांच्या संशयावरून केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई

राजकीय पदाधिकाऱ्याच्या व्यवसायावर सांगलीत छापे, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई
सांगली : सांगलीतील एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या व्यवसायावर गुरुवारी केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर विभागाने छापे मारून तपासणी केली. बोगस बिलांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. कारवाईबाबत गोपनीयता बाळगली असून, व्यवसायात अनियमितता आढळून आल्याचे समजते. या कारवाईची राजकीय वर्तुळात सायंकाळपासून चर्चा सुरू होती.
जिल्ह्यातील या संबंधित राजकीय पदाधिकाऱ्याचा व्यवसाय आहे. सांगली मुख्य रस्त्यावर या पदाधिकाऱ्याचे व्यवसायाचे ठिकाण आहे. या व्यवसायातून बोगस बिले दाखवून उलाढाल दाखविल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाला मिळाली होती.
कोल्हापूर येथील गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी सांगलीत येऊन या पदाधिकाऱ्याच्या व्यवसायाची चौकशी सुरू केली. उशिरापर्यंत झालेल्या तपासणीत कोट्यवधींची उलाढाल बोगस बिलांच्या माध्यमातून करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे समजते.
राजकीय पदाधिकाऱ्याच्या सांगलीतील कार्यालयावर आणि निवासस्थानी केंद्रीय जीएसटी विभागाने छापे मारल्याच्या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. केंद्रीय जीएसटी विभागाने याबाबत कोणतीही अधिक माहिती दिली नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत हा राजकीय पदाधिकारी कोण? त्याचा व्यवसाय कोणता? याची अनेकजण एकमेकांना विचारणा करत होते.