आर. आर.-सगरे गटाचेच वर्चस्व

By Admin | Updated: September 22, 2014 00:55 IST2014-09-22T00:50:16+5:302014-09-22T00:55:31+5:30

महांकाली कारखाना निवडणूक : संपूर्ण पॅनल विजयी; संजय पाटील गटाचे पानिपत

R. R-Sage group dominates | आर. आर.-सगरे गटाचेच वर्चस्व

आर. आर.-सगरे गटाचेच वर्चस्व

कवठेमहांकाळ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महायुती नेत्यांच्या पॅनलचा धुव्वा उडवीत राष्ट्रवादीच्या पॅनलने मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व पंधरा जागांवर विजय मिळविला.
आबा-सगरे गटाच्या महांकाली शेतकरी विकास पॅनलने खासदार संजय पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, जयसिंगराव शेंडगे यांच्या राजारामबापू शेतकरी विकास पॅनलला विधानसभेपूर्वीच धक्का दिला आहे. निकालानंतर आबा-सगरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयी
जल्लोष केला. विजयी उमेदवारांना पाच हजाराचे मताधिक्य मिळाले, तर विरोधी गटाला १२00 पेक्षा अधिक मते मिळविता आली नाहीत.
निवडणुकीत एकूण अकरा हजार तीनशे तेरा सभासदांपैकी सात हजार आठशे तेवीस सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. रविवारी सकाळी आठ वाजता कारखान्याच्या साखर गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी महेश कदम यांनी निकाल जाहीर केला. आबा-सगरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निकालानंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली. शहरातून घोषणाबाजी करत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
कारखान्याच्या कार्यस्थळावर गृहमंत्री आर. आर. पाटील दाखल होताच शेकडो कार्यकर्त्यांनी आर. आर. पाटील, विजय सगरे व युवा नेते गणपती सगरे यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला व शहरातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढली.
घोरपडे गटाला धक्का
महांकाली पॅनेलच्या विजयाने आबा-सगरे गटाचे कार्यकर्ते एकीकडे रिचार्ज झाले आहेत; तर अजितराव घोरपडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभेची ही रंगीत तालीम म्हणून दोन्ही पॅनेल लढत होते.
तिन्ही नेते अपयशी
कारखाना निवडणुकीत खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे व जगसिंगराव शेंडगे या तिन्ही नेत्यांची ताकद एकवटली होती. तरीही त्यांना पॅनेलमधील एकाही सदस्याला निवडून आणता आले नाही. त्यामुळे या निकालातून त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

Web Title: R. R-Sage group dominates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.