Sangli: सुंदर गाव स्पर्धेत कडेपूर, पिंपळवाडी विजेते; २० लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:32 IST2025-02-26T18:29:35+5:302025-02-26T18:32:25+5:30
१० गावांना प्रत्येकी १० लाख रुपये मिळणार

Sangli: सुंदर गाव स्पर्धेत कडेपूर, पिंपळवाडी विजेते; २० लाखांचे बक्षीस
सांगली : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत कडेपूर (ता. कडेगाव) आणि पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) या गावांना विभागून प्रथम क्रमांक जाहीर झाला. दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी ही माहिती दिली.
गावात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी, पर्यावरणाचे संवर्धन, जतन आणि संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करण्यासाठी या पुरस्कार योजनेतून उत्तेजन दिले जाते. त्यानुसार २०१०-११ पासून पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविण्यास सुरुवात झाली. २०१६-१७ पासून स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्याचा निर्णय झाला. त्याला आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे. या स्पर्धेत अनेक निकषांनुसार गुणांकन पद्धतीने गावांची तपासणी करण्यात येते.
पुरस्कार प्राप्त गावांचा लवकरच सन्मान
सन २०२३-२४ साठी तालुकास्तरीय समितीने २५ टक्के ग्रामपंचायतींची फेरतपासणी केली. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने केली. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या पाच घटकांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुरस्कार प्राप्त गावांचा लवकरच सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
तालुकानिहाय प्रथम गावे
धामणी (तासगाव), शिरसी (शिराळा), कवठेपिरान (मिरज), कडेपूर (कडेगाव), बसरगी (जत), सुरूल (वाळवा), सावंतपूर (पलूस), पिंपळवाडी (कवठेमहांकाळ), खरसुंडी (आटपाडी), आळसंद (खानापूर). या प्रत्येक गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे.