पलूस तालुक्याला अवकाळीचे ग्रहण!

By Admin | Updated: March 23, 2015 00:38 IST2015-03-22T23:34:29+5:302015-03-23T00:38:18+5:30

क्षारपड जमिनीच्या क्षेत्रात वाढ : चौदा हजार एकरातील द्राक्षबागा भुईसपाट

Pulus taluka receives eclipse! | पलूस तालुक्याला अवकाळीचे ग्रहण!

पलूस तालुक्याला अवकाळीचे ग्रहण!

आर. एन. बुरांडे - पलूस -संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला, तरी कृषिसंपन्न आणि सधनतेची दैवी देणगी लाभलेला कृष्णा-येरळा यांच्या कुशीतील पलूस तालुका मात्र दुष्काळापासून नेहमीच कोसोदूर राहिलेला आहे. परंतु अलीकडे मात्र अवकाळी पाऊस आणि क्षारपड जमिनीमुळे पलूस तालुक्यालाही ग्रहण लागले आहे.
कृष्णा-येरळा या नद्यांच्या कुशीतील पलूस तालुक्यात खासगी आणि सहकारी पाणी योजनांमुळे शेत शिवाराची इंच न् इंच जमीन ओलिताखाली आली आहे. त्यातून फुललेली समृध्दीची हिरवळ हे पलूस तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. तालुका ३४ गावांचा आहे. पैकी एक, दोन गावांचा अपवाद वगळता उरलेली सर्व गावे कृषिसंपन्न आहेत.
तालुक्याचे क्षेत्रफळ २७४४५.८३ हेक्टर आहे. पैकी लागवडीखालील क्षेत्र २४६९६ हेक्टर आहे, तर बागायती क्षेत्र १८११३.५५ हेक्टर आहे आणि कोरडवाडू क्षेत्र केवळ ६५८० हेक्टर आहे. तालुक्यात प्रामुख्याने ऊस, द्राक्षे, सोयाबीन, ज्वारी,गहू, हरभरा, मका, हळद, भुईमूग, केळी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. लहानशा या तालुक्यात द्राक्षशेती १४ हजार एकरावर केली जाते.
पलूस तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४८०.२ इतके आहे. मात्र बारमाही प्रवाहित कृष्णा नदीमुळे आणि शेती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याने तालुक्यातील भूजल पातळी बाराही महिने समाधानकारक असते. तालुक्यात एकसुध्दा धरण नाही अथवा तलाव नाही. तरीसुध्दा तालुका कृषिसंपन्न झाला आहे.
शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, शेडनेटच्या साहाय्याने फूलशेती, फळभाजी याशिवाय चाऱ्याच्या मुबलकतेमुळे पशुधनसुध्दा मोठे आहे. अशा या समृध्द पलूस तालुक्याला आता अवकाळी पावसाने अक्षरश: धुऊन काढले आहे. १४ हजार एकरावरील द्राक्षशेती फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे.
बागांचा एकरी खर्च वाढला आहे. शासनाच्या पंचनाम्याचे किचकट निकष यामुळे बागायतदारांना भरपाई देण्यात अडचणी येत आहेत. या अवकाळीमुळे बेदाण्याचा दर्जा खालावला आहे. रब्बी पिकांपैकी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकरी अक्षरश: हबकला आहे. बेभरंवशाची शेती करण्यापेक्षा अन्य शेतीकडे वळण्याचा शेतकऱ्यांचा कल दिसून येऊ लागला आहे. तालुक्यातील अवकाळीमुळे पीकनिहाय बाधित झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे- द्राक्षे ३०८.७६, गहू १०.९०, ज्वारी २३.२१, हरभरा २०.२३२, हळद १.८०.
कृषिसंपन्न पलूस तालुक्याचे अवकाळी पाऊस मोठे नुकसान करीत असताना, पाण्याच्या अतिवापराने आणि शेतीच्या पारंपरिक पध्दतीमुळे तालुक्याला क्षारपडचा प्रश्न तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, वसगडे, आमणापूर, दुधोंडी, पुणदी, नागराळे, धनगाव गावांना सतावू लागला आहे. तालुक्यात क्षारपडचे क्षेत्र ६८२४.४४ हेक्टर एवढे आहे. यात हळूहळू वाढ होत आहे. या कृषिसंपन्न तालुक्याला अवकाळीने आणि क्षारपड प्रश्नाने जेरीस आणले आहे. तालुक्यातील शेतकरी मात्र हतबल झाला आहे.

अवकाळीमुळे बेदाण्याचा दर्जा खालावला आहे. रब्बी पिकांपैकी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवकाळीमुळे द्राक्षाचे ३०८.७६, गहू १०.९०, ज्वारी २३.२१, हरभरा २०.२३२, तर हळदीचे १.८० हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. बागांचा एकरी खर्च वाढला आहे. शासनाच्या पंचनाम्याचे किचकट निकष यामुळे बागायतदारांना भरपाई देण्यात अडचणी येत आहेत.

Web Title: Pulus taluka receives eclipse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.