हिमोफिलियाबाबत जनजागृती आवश्यक
By Admin | Updated: January 25, 2015 00:43 IST2015-01-25T00:43:50+5:302015-01-25T00:43:50+5:30
कंजक्षा घोष : रुग्णांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे कार्यशाळेत आवाहन

हिमोफिलियाबाबत जनजागृती आवश्यक
सांगली : समाजात कमी प्रमाणात आढळून येणाऱ्या ‘हिमोफिलिया’ या आजाराबाबत जनजागृती गरजेची असून, संबंधित रुग्णांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन हिमोफिलिया फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष कंजक्षा घोष यांनी केले. जिल्ह्यातील हिमोफिलिया रुग्णांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. घोष म्हणाले, हिमोफिलिया हा अनुवंशिक आजार असून, पालकांच्या जनुकाव्दारे तो मुलांमध्ये येतो. या आजारामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया सदोष असल्याने यामध्ये जखम झाल्यावर अथवा दात काढल्यावर रक्त वाहणे बंद होत नाही.
रक्त गोठण्यासाठी उपयुक्त घटकांची कमतरता असल्याने या आजाराच्या रुग्णांना इंजेक्शनच्या माध्यमातून संबंधित घटक पुरविले जातात. या आजाराने जिल्ह्यात सुमारे ९० रुग्ण ग्रस्त आहेत. त्यांनी संघटित होणे गरजेचे आहे.
सध्या भारतात या आजाराचे सोळा हजार रुग्ण आहेत. संबंधितांनी शासकीय रुग्णालयातून उपचार घ्यावेत जेणेकरून त्यांची नोंद रुग्णालयाच्या नोंदवहित करण्यात येईल. यामुळे रुग्णांसाठी
भविष्यात कोणतीही शासकीय योजनेची अंमलबजावणी
करावयाची असेल तर, प्रशासनास हिमोफिलियाचे नक्की किती रुग्ण आहेत, याची आकडेवारी उपलब्ध होईल.
सायंकाळी शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
शहरातील विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉ. घोष, डॉ. देवीला साहू, डॉ. जयश्री काळे आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता दीप्ती डोणगावकर, डॉ. विकास कुरेकर, हॉ. अरविंद मांजरेकर, विजयकुमार निरवाणे, सदाशिव हेगडे आदी उपस्थित होते.