इस्लामपुरात पं. स.चा अधिकारी निलंबित
By Admin | Updated: July 4, 2014 00:46 IST2014-07-04T00:44:38+5:302014-07-04T00:46:55+5:30
चौकशीत अडथळा : ग्रामसमृध्द योजना

इस्लामपुरात पं. स.चा अधिकारी निलंबित
इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीमधील ग्रामपंचायत प्रशासन विभागाकडील अधिकारी संजय माने यांना खात्यांतर्गत चौकशीमध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईला गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी दुजोरा दिला.
दोन वर्षांपूर्वी तालुक्यात राबवण्यात आलेल्या पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेत झालेल्या कामाची चौकशी सुरू होती. तत्कालीन अधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रसारासाठी गावोगावी फलक लावण्याची मोहीम हाती घेतली होती. हे फलक लावण्यासाठी निधी जमा करण्यात आला होता. या घटनेची चौकशी करण्याचे अधिकार सहाय्यक गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्याकडे देण्यात आले होते.
पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतील आक्षेपार्ह कामांची चौकशी करीत असताना त्यामध्ये वरिष्ठ विस्तार अधिकारी संजय माने यांनी अडथळा आणला. त्यामुळे त्यांना निलंबित करून शिराळा येथे पाठवण्यात आल्याचे गटविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. दरम्यान, चौकशी अधिकारी राहुल रोकडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)