माजी सभापतीसह सहा जणांची मालमत्ता जप्त; थकबाकीपोटी सांगली महापालिका प्रशासनाचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:43 IST2025-08-07T17:43:11+5:302025-08-07T17:43:21+5:30
थकबाकीदारांचे धाबे दणाणले

माजी सभापतीसह सहा जणांची मालमत्ता जप्त; थकबाकीपोटी सांगली महापालिका प्रशासनाचा बडगा
सांगली : महापालिका क्षेत्रातील थकबाकीदारांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी ३३ लाखांच्या थकबाकीपोटी मिरजेतील स्थायी समितीचे माजी सभापती महादेव कुरणे यांच्यासह सहा जणांची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. पाच मालमत्ताधारकांकडून २० लाख २६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. या कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. तसेच कारवाईची चर्चा रंगली आहे.
महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची थकबाकी तब्बल ९४ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. ५० हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या २ हजार ९५ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या आहेत. तर ५ हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या ३४ हजार १९५ मालमत्ताधारकांनादेखील या नोटिसा पाठवल्या आहेत.
आयुक्त सत्यम गांधी यांनी थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जप्ती व वसुली करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. विभागनिहाय जप्ती पथके नियुक्त करून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे. या पथकांकडून सहा जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. यामध्ये स्थायी समितीचे माजी सभापती महादेव कुरणे यांची मिरज हायस्कूल रस्त्यावरील मालमत्ता जप्त केली आहे. त्यांची थकबाकी ४ लाख ८६ हजार रुपये होती. तर मिरज कर्मवीर चौकातील आण्णासाहेब घाडगे यांच्या मालमत्तेची २ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यांची मालमत्ता सील करण्यात आली.
सांगली चैतन्यनगर येथील इंडियन ऑइल कंपनी (विरूपाक्ष पेट्रोलियम) यांची ४ लाख ८४ हजार, औद्योगिक वसाहत येथील मगदूम मुनीर शहाबुद्दीन यांची ९ लाख ३० हजार, माधवनगर रस्ता येथील रुक्मिणी पॅकेजिंग यांची ५ लाख ६९ हजार व जिल्हा परिषद परिसरातील साईप्रसाद फूड यांची ६ लाख ४३ हजार रुपये थकबाकीपोटी मालमत्ता सील करण्यात आल्या.
तर बुधवारी २० लाख २६ हजार रुपये वसूल करण्यात आले. यामध्ये सिधी पुरुषार्थ पंचायत ट्रस्ट यांच्याकडून २ लाख, ऑरबिट कॉप सायन्सेस ॲण्ड केमिकल्स यांच्याकडून १ लाख ४९ हजार, दत्तात्रय पवार यांच्याकडून १ लाख ४० हजार, संतोष आरवट्टगी यांच्याकडून १२ लाख रुपये व जवाहर पटेल यांच्याकडून ३ लाख रुपये वसूल करण्यात आले.