मिरजेत अनिल बाबर यांच्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांची उडाली धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:10 IST2022-07-08T17:09:52+5:302022-07-08T17:10:30+5:30
जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरज सिव्हिलमध्ये आले असात घडला प्रकार

मिरजेत अनिल बाबर यांच्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांची उडाली धावपळ
मिरज : कवठेमहांकाळ येथे अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरज सिव्हिलमध्ये आलेल्या आमदार अनिल बाबर यांच्यासमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यामुळे आमदार बाबर यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली.
गुरुवारी दुपारी शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासोबत जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरज सिव्हिलमध्ये गेले होते. अनिल बाबर यांनी जखमींची विचारपूस करून मोबाइल व्हिडिओ काॅलवर जखमी वारकऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद करून दिला.
याचवेळी शिवसेनेतर्फे वारकऱ्यांना मदत देण्यासाठी माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील तानाजी सातपुते, चंद्रकांत मैगुरे, आनंद रजपूत, गिरीश देसाई, सुनीता मोरे यांच्यासह कार्यकर्ते तेथे आले. आमदार बाबर यांना पाहताच शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद, आदित्य ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
घोषणाबाजीमुळे आमदार बाबर यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याभोवती कडे केले. याबाबत पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर घोषणा देणाऱ्यांनी आमच्याकडे यावे, त्यांचा पाहुणचार करू, असे आमदार बाबर यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम मदत देण्यात आली.