जिल्हा परिषद अध्यक्षपदी होर्तीकर
By Admin | Updated: September 22, 2014 00:55 IST2014-09-22T00:50:58+5:302014-09-22T00:55:24+5:30
उपाध्यक्षपदी लिंबाजी पाटील : जगताप गटाला धक्का

जिल्हा परिषद अध्यक्षपदी होर्तीकर
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्माक्का होर्तीकर (उमदी, ता. जत), तर उपाध्यक्षपदी लिंबाजी पाटील (तांबवे, ता. वाळवा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षासाठी संधी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विलासराव जगताप यांना शह देण्यासाठीच दुष्काळी जत तालुक्याला अध्यक्षपदाची संधी दिल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव तूर्त नाकारल्याने कॉंग्रेसने या निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. जिल्हा परिषदेते राष्ट्रवादीचे ३३, काँग्रेसचे २३, स्वाभिमानी आघाडीचे तीन, जनसुराज्यचा एक आणि दोन अपक्ष अशी सदस्यसंख्या आहे.
राष्ट्रवादीला जनसुराज्य पक्षाच्या एका सदस्याचा आणि दोन अपक्षांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांचे स्पष्ट बहुमत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. दिघंची (ता. आटपाडी) गटातील मनीषा पाटील, तासगाव तालुक्यातील कल्पना सावंत (सावळज), स्नेहल पाटील (येळावी) हे राष्ट्रवादीचे सदस्य, तर अपक्ष योजना शिंदे (मणेराजुरी) यांनी अध्यक्ष पदावर दावा केला होता. इच्छुक वाढल्यामुळे आर. आर. पाटील, जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी मुंबईत दोन बैठका घेतल्या. त्यानंतर शनिवारी रात्री दीड वाजेपर्यंत अध्यक्ष पदाच्या निवडीची चर्चा चालूच होती. तासगाव तालुक्यातील सदस्यांचे अध्यक्षपदाबद्दल एकमत न झाल्यामुळे मनीषा पाटील आणि रेश्माक्का होर्तीकर यांची नावे चर्चेत आली. सध्याच्या विधानसभा निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून होर्तीकर यांना अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मनीषा पाटील समर्थक नाराज झाले. तानाजी पाटील यांनी, पक्षाशी एकनिष्ठ राहूनही न्याय मिळत नसल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. परंतु, आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व त्यामाध्यमातून जगताप यांना शह देण्यासाठी होर्तीकर यांना संधी दिली. जयंत पाटील यांनीही होर्तीकरांच्या नावास सहमती दर्शविली.
सव्वा वर्षासाठी ही निवड असून त्यानंतर अन्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असे जाहीर केले. कॉंग्रेसने उमेदवारच उभे न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुपारी अध्यक्षपदी होर्तीकर यांची, तर उपाध्यक्षपदी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. एकूण ६२ सदस्यांपैकी दहाजण गैरहजर होते.