सध्या तरी इको फ्रेंडली बांधकामे वाढणे अशक्यच-- थेट संवाद

By Admin | Updated: September 20, 2014 00:30 IST2014-09-19T23:45:52+5:302014-09-20T00:30:33+5:30

वास्तुविशारद शंकर कानडे यांचे मत

At present, impossible to grow eco-friendly constructions - direct communication | सध्या तरी इको फ्रेंडली बांधकामे वाढणे अशक्यच-- थेट संवाद

सध्या तरी इको फ्रेंडली बांधकामे वाढणे अशक्यच-- थेट संवाद

--सध्याच्या वास्तुविशारदांच्या कार्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?
- वास्तुविशारद होणे म्हणजे केवळ महाविद्यालयाची अथवा विद्यापीठाची पदवी घेणे नव्हे. त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे. सतत नावीन्यपूर्ण शिकण्याची ओढ पाहिजे. सध्या देखील अनेक चांगले वास्तुविशारद कार्यरत आहेत. त्यांनी बांधलेल्या इमारतींकडे पाहिल्यास आपल्याला त्याचा अनुभव येईल. परंतु हे करतानाच आपल्या देशात कशा प्रकारच्या इमारतींची निर्मिती करावी, या दृष्टिकोनातूनही प्रयत्न होणे गरजेचे आहे. नवीन वास्तुविशारदांनी त्या दिशेने पावले टाकल्यास भविष्यकाळात त्याचा निश्चितच उपयोग होईल.
--आपण वास्तुविशारद या क्षेत्राकडे कसे आलात?
- खरं सांगायचं तर मी ठरवून या क्षेत्रात आलो नाही. मी मूळचा सांगली जिल्ह्यातील नागजचा. माझे शालेय शिक्षण सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले. त्याकाळी माझा परिचय चित्रकलेमधील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे जांभळीकर यांच्याशी झाला. मला असलेली चित्रकलेची आवड पाहून त्यांनी मला आर्किटेक्टला जाण्याचा सल्ला दिला. वास्तविक मला त्या क्षेत्राचे काहीच ज्ञान नव्हते. तरीही मी मुंबई येथील जे. जे. कॉलेज आॅफ आर्किटेक्टमध्ये प्रवेश घेतला.
--आवड नसताना देखील एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे शक्य आहे का?
- तसे नाही. प्रत्येकाकडे कोणते ना कोणते कलागुण असतातच. फक्त त्याकडे आपले लक्ष नसते. माझ्याकडे कला होती, परंतु त्याचा कोठे योग्य उपयोग करायचा, हे मला समजत नव्हते. जांभळीकरांनी माझ्यातले गुण हेरले आणि माझी दिशाच बदलून गेली. गुरुच्या मार्गदर्शनाला तुमच्या अथक् प्रयत्नांची जोड मिळाली, तर काहीही अशक्य नाही. सध्या माझी बेंगलोर येथे ‘शिल्प सुंदर’ या नावाने आर्किटेक्चर कंपनी आहे. पैसे मिळविणे हा हेतू यामागे नाही. समाजाला नवनवीन कल्पनांचा आविष्कार कलेच्या माध्यमातून देणे, हेच आमचे धोरण आहे. कमी खर्चात इमारत बांधण्याचा ‘चपडी’ इको फ्रेंडली प्रकार आम्ही विकसित केला. त्यामुळे साधारणत: ४० टक्के खर्च वाचण्यास मदत होते.
---इको फ्रेंडली इमारतींना उज्ज्वल भविष्यकाळ आहे का?
- सध्याची परिस्थिती पाहता, मला तसे वाटत नाही. आपल्याकडे काय चांगले आहे हे पाहण्यापेक्षा, आपल्याला पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यातच जास्त रस आहे. याला कोणतेच क्षेत्र अपवाद नाही. हल्ली काचेच्या इमारती तयार करण्याचे फॅड निघाले आहे. परंतु अशा इमारती या आरोग्याच्यादृष्टीने घातक सिध्द होत आहेत. अमेरिकेत तर या प्रकारावर बंदी घातली आहे. परंतु असे असले तरीही, आपल्याकडे मात्र उंचच्या उंच काचेच्या इमारती उभारण्याकडेच कल आहे. येथील हवामानाला अनुरुप बांधकामाची निर्मिती होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. अंधानुकरण करण्याचे आपण जोपर्यंत थांबवत नाही, तोपर्यंत तरी भारतात इको फ्रेंडली इमारतींना मागणी वाढण्याची सुतराम शक्यता नाही.
----महाविद्यालयात शिकविण्यात येणारा वास्तुविशारदचा अभ्यासक्रम काळानुरुप आहे का?
- दुर्दैवाने आपण अद्यापही ब्रिटिशकालीन अभ्यासक्रमच शिकत आहोत. सध्याचे विद्यार्थी हे ज्ञान मिळविण्यासाठी नव्हे, तर पैसा मिळविण्यासाठीच या क्षेत्राकडे वळतात. त्यामुळे नवीन काही करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होईल का याचा प्रत्येकाने विचार करावा. वास्तुविशारद या विषयाबाबत जागृती झाली पाहिजे. अनुभवी वास्तुविशारदांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनीही अनुभवजन्य शिक्षण घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
----‘अवनीश’सारख्या प्रदर्शनाचा भावी वास्तुविशारदांना लाभ होईल का?
- या प्रदर्शनात देखील भारतीय दृष्टिकोनातून बांधण्यात आलेल्या इमारतींचा अभ्यास होणे, त्यावर चर्चासत्र आयोजित करणे आवश्यक आहे. आपल्या इथे मुघल आणि बौध्द काळात अनेक उत्तम वास्तूंची निर्मिती झाली आहे. त्याकडेही आपण चिकित्सक दृष्टीने पाहायला पाहिजे. आपल्याकडे जो सुंदर ठेवा आहे, त्याकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे.
--नरेंद्र रानडे

वास्तुविशारद शंकर कानडे यांचे मत
वास्तुविशारद म्हणजे कला आणि कौशल्य यांचा अनोखा संगम ! भावी वास्तुविशारदांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने सांगलीत २१ व्या ‘महाकॉन अवनीश २०१४’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या बेंगलोर येथे कार्यरत असलेले व मूळचे सांगली जिल्ह्यातील नागजचे ज्येष्ठ वास्तुविशारद शंकर कानडे यांना ‘नानासाहेब मोहिते आर्किटेक्चरल एक्सलन्स अ‍ॅवार्ड’ने गौरविण्यात आले. त्यांनी वास्तुविशारदांना नवी ‘दृष्टी’ देण्याचे काम केले. त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

Web Title: At present, impossible to grow eco-friendly constructions - direct communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.