CoronaVirus Lockdown : विनामोबदला दारू घरपोहोच करण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:32 IST2020-05-08T12:30:47+5:302020-05-08T12:32:13+5:30
दारूच्या दुकानांवर होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून उद्भवणारे संभाव्य संकट पाहता, जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटनेच्या भाजी विक्रेत्यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय दारूप्रेमींना दारू घरपोहोच करण्याची तयारी दर्शविली आहे.

CoronaVirus Lockdown : विनामोबदला दारू घरपोहोच करण्याची तयारी
सांगली : दारूच्या दुकानांवर होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून उद्भवणारे संभाव्य संकट पाहता, जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटनेच्या भाजी विक्रेत्यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय दारूप्रेमींना दारू घरपोहोच करण्याची तयारी दर्शविली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशी परवानगी द्यावी किंवा त्यांच्या यंत्रणेमार्फत दारू घरपोहोच करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शंभुराज काटकर यांनी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष काटकर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, कैस अलगर, अजित राजोबा यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात काटकर यांनी म्हटले आहे की, गेला दीड महिना सांगली जिल्ह्याचे प्रशासन आणि शहरातील व्यापारी गर्दी टाळण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत.
आम्ही लोकांना सामान्य दरामध्ये भाजी घरपोहोच करण्याची सोय १११ भाजीपाला वाहनांद्वारे करीत आहोत. मात्र, दारूसाठी होणारी गर्दी आणि भर उन्हात तासन् तास लोकांना उभे करायला लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाने होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचारच केलेला नव्हता असे दिसते. त्यामुळे दीड-दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आणि अजूनही तीन दिवसांनंतर त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
पाच फूट अंतरावर एक व्यक्ती उभी करण्याचे धोरण जाहीर झाले असेल आणि दुकानाच्या दारात तशी व्यवस्था केली तरी, ते पाळले जाईलच असे कुठेही दिसत नाही.
देशी दारूच्या दुकानावर तर सहाशे-सातशे लोक एकमेकाला खेटून उभे असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. असेच सुरू राहिले तर सांगली संकटात सापडायला फार वेळ लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आम्हाला वाटते.
वास्तविक मद्य विक्रेत्यांना मागणीनुसार त्यांच्या परिसरात पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन उत्पादन शुल्क विभागाने केले पाहिजे. त्यांना जर ते शक्य नसेल, तर महापालिका क्षेत्रात आमच्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गाड्या फिरत आहेत, ते मोबदला न घेता केवळ कोरोना रोखण्यासाठी सेवा द्यायला तयार आहेत.
मद्य विक्रेत्यांनी आॅर्डर आणि आॅनलाईन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पैसे स्वीकारून, मद्य ज्यांच्याकडे पोहोचवायचे असेल, त्यांचा पत्ता दिल्यास त्या भागातील विक्रेते भाजीपाल्याबरोबरच या वस्तू पोहोच करतील. मद्य पुरवणे चांगले की वाईट, या वादात न पडता, केवळ गर्दी टाळून आणि लोकांचे हाल न होता कोरोनाचे संकटही टाळावे, या उद्देशाने सेवा देण्याची तयारी आहे, असे म्हटले आहे.