हवालदाराच्या मुलीनं उचलली चांदीची गदा; सांगलीची लेक ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:50 PM2023-03-24T19:50:44+5:302023-03-24T19:51:12+5:30

सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.

Pratiksha Bagdi of Sangli has become the first woman Maharashtra Kesari | हवालदाराच्या मुलीनं उचलली चांदीची गदा; सांगलीची लेक ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

हवालदाराच्या मुलीनं उचलली चांदीची गदा; सांगलीची लेक ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

googlenewsNext

women maharashtra kesari । सांगली : सांगली येथे पार पडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजयाचा मान प्रतीक्षा बागडी हिला मिळाला आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला अस्मान दाखवून प्रतीक्षाने चांदीची गदा उंचावली. खरं तर महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरलेली प्रतीक्षा ही एका पोलीस हवालदाराची मुलगी आहे. 


पुरूष महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आयोजित करण्यात आली. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांगलीत ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित या स्पर्धेच्या विजयाचा मान सांगलीच्या लेकीने पटकावला. 23 आणि 24 मार्च या दोन दिवशी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पार पडली. एकेकाळी एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन पैलवानांमध्ये अंतिम सामना झाला. दोन मैत्रिणींमधील लढत पाहण्यासाठी कुस्ती चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. अखेर सांगलीच्या प्रतीक्षाने 'प्रतीक्षा' संपवत कल्याणच्या वैष्णवी पाटीलला अस्मान दाखवून महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. 


प्रतीक्षा बागडीनं रचला इतिहास
पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा मान पटकावणारी प्रतीक्षा बागडी ही मूळची सांगलीच्या तुंग गावची आहे. प्रतीक्षा ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथे सराव करते. लक्षणीय बाब म्हणजे राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या प्रतीक्षाने खेलो इंडियामध्ये रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात देखील रौप्य पदक जिंकले होते. 

 

Web Title: Pratiksha Bagdi of Sangli has become the first woman Maharashtra Kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.