महापालिका निवडणूक जाहीर होताच सांगलीत राजकीय हालचाली गतीमान, पक्षप्रवेशाचे राजकारण रंगले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:05 IST2025-12-16T16:04:27+5:302025-12-16T16:05:58+5:30
जागावाटपात रस्सीखेच कायम

महापालिका निवडणूक जाहीर होताच सांगलीत राजकीय हालचाली गतीमान, पक्षप्रवेशाचे राजकारण रंगले
सांगली : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात सर्वच राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी झाल्या. मुख्यमंत्री सांगलीत असल्याने सर्वपक्षीय नेते एकवटले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पक्षीय बैठकांमध्ये लागलीच रणनीती आखण्यात आली.
सांगलीत सोमवारी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी बैठक घेत महाविकास आघाडी गठीत करण्यासाठी प्राथमिक चर्चा केली. जागावाटपाबाबत अद्याप त्यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय जवळपास निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर एकत्र येत बैठक घेण्याबाबत चर्चा केली. भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, अन्य घटक पक्षांच्या मुलाखती व्हायच्या आहेत. त्या पूर्ण होताच महायुतीबाबत जागावाटपाची चर्चा केली जाणार असल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले असल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाबाबत येत्या दोन दिवसांत बैठका होणार असल्याचे समजते.
पक्षप्रवेशाच्या हालचाली
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारीबाबत कोणालाही खात्री नाही. यातच कुंपणावर असलेल्या इच्छुकांनी आतापासून पक्षप्रवेशाचे राजकारण सुरू केले आहे. सोमवारी सकाळी मिरजेतील महाविकास आघाडीतील काही माजी नगरसेवकांनी पुणे गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे वातावरण भलतेच तापले आहे.
जागावाटपात रस्सीखेच कायम
महाविकास आघाडी व महायुतीत मित्रपक्षांमध्ये अजूनही जागावाटपाची रस्सीखेच सुरूच आहे. प्रत्येकाने जागांच्या अपेक्षा जाहीर केल्यामुळे तो तिढा सोडविण्याचे आव्हान प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर असणार आहे. महाविकास आघाडीत याचा फैसला विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्या हाती तर महायुतीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या हाती राहण्याची चिन्हे आहेत. भाजपची कोअर कमिटीही याबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते.