पोलीस निरीक्षक, कर्मचाऱ्यात वादावादी
By Admin | Updated: September 14, 2014 23:55 IST2014-09-14T22:58:02+5:302014-09-14T23:55:34+5:30
पोलीसप्रमुखांकडून दखल : विश्रामबाग ठाण्यातील प्रकार

पोलीस निरीक्षक, कर्मचाऱ्यात वादावादी
सांगली : विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे व हेड कॉन्स्टेबल अकीब काझी यांच्यात पोलीस ठाण्यातच गैरहजेरी मांडल्याच्या कारणावरून जोरदार वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचाही प्रकार घडला. शिवीगाळही करण्यात आली. या प्रकारानंतर भांगे हे रजेवर गेल्याने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या प्रकाराची गंभीर दाखल घेतली. चौकशी करून काझी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी आज (रविवार) सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आठवड्यापूर्वी जतचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब रेड्डी यांचे निधन झाले होते. त्यावेळी काझी ड्युटीवर असताना कोणास काही न सांगता रेड्डींच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ते पोलीस ठाण्यात परतले, त्यावेळी त्यांना त्यांची गैरहजेरी मांडल्याचे समजले. याचा जाब त्यांनी निरीक्षक भांगे यांना विचारला. भांगे यांनी त्यांना ‘तू कोण मला विचारणार’असे सुनावले. यातून दोघांत जोरदार वाद झाला. शिवीगाळही करण्यात आली. त्यांच्यात सुरू असलेल्या जोराच्या वादावादीने मुख्यालयाच्या परिसरातील पोलिसांनी ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचाही प्रकार घडला. या प्रकारानंतर भांगे यांनी स्टेशन डायरीला नोंदही केल्याचे समजते, मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नाही.
यासंदर्भात पोलीसप्रमुख सावंत म्हणाले, घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कर्मचारी जर ठाण्याच्या प्रमुखांना शिवीगाळ करून अंगावर धाऊन जात असेल, तर त्या पदाला काहीच अर्थ नाही. काझी यांचे एवढे धाडस कसे झाले. त्यांची चौकशी केली आहे. चौकशीत ते दोषी आढळले, तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)
धनंजय भांगे रजेवर
सावंत म्हणाले, भांगे सध्या रजेवर आहेत. या प्रकारामुळे ते रजेवर गेले आहेत की काय? याची माहिती घेतली जाईल. ते येत्या एक-दोन दिवसात हजर होतील. त्यांच्याकडूनही माहिती घेतली जाईल. विश्रामबाग ठाण्यातून बदली होऊनही काहीजण तळ ठोकून असतील, तर त्यांना सोडले जाईल.