माणदेशी सचिन खिलारीची अर्जुन पुरस्काराला गवसणी, भारताला ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये मिळवून दिले पदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:48 IST2025-01-03T11:45:06+5:302025-01-03T11:48:22+5:30
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आटपाडी तालुक्यात आनंदोत्सव

माणदेशी सचिन खिलारीची अर्जुन पुरस्काराला गवसणी, भारताला ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये मिळवून दिले पदक
आटपाडी : शारीरिक कमकुवतपणालाच आपली ताकद बनवत स्वतःला क्रीडाविश्वात सिद्ध करणाऱ्या करगणी (ता. आटपाडी) गावचा सुपुत्र व पॅरा ऑलिम्पिकवीर सचिन खिलारी याला क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. माणदेशातील सचिनला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तालुक्यात गुरुवारी आनंदोत्सव साजरा होत आहे.
सचिन खिलारी याने पॅरिस येथील पॅरा ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ ४६ प्रकारात रौप्यपदक पटकावत देशाचे लक्ष वेधले होते. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची केंद्र शासनाने दखल घेतली. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सचिनला गुरुवारी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या सचिनचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिवंगत ॲड. सर्जेराव खिलारी यांचा सचिन हा मुलगा. अवघ्या नवव्या वर्षी सचिन सायकल चालवताना पडला. त्यामध्ये त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. मात्र काही दिवसात ‘गँगरीन’ झाले. जीवघेण्या संकटातून ताे बचावला. पण, त्याच्या हाताच्या हालचालींवर कायमस्वरूपी मर्यादा आल्या. त्याला अपंगत्व आले.
बालपणातच झालेला मोठा आघात सचिनने माेठ्या धैर्याने पचविला. लहानपणापासून त्याला खेळाची कमालीची आवड होतीच. शारीरिक मर्यादेचे भांडवल न करता त्याने थेट माेठे मैदान गाजवण्याचा निर्धार केला. अथक परिश्रम आणि स्वप्नपूर्तीच्या निरंतर ध्यासातून सचिन सर्जेराव खिलारी हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले. इंजिनिअर असलेल्या सचिनने देशवासीयांची मान गर्वाने उंचावली आहे. त्याचबराेबर संकटाचे संधीमध्ये कसे रूपांतर करावे, याचा आदर्श देशातील तरुणाईसमाेर ठेवला आहे.
सचिनची दैदीप्पमान कामगिरी..
पुण्यात सचिन खिलारीने पहिल्यांदा आझम कॅम्पसमध्ये ॲथलेटिक्स ट्रॅक पाहिला. येथेच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ॲथलेटिक्समध्येच करिअर करण्याचा निश्चय करत प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीफेक व भालाफेकला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत सचिन खिलारीने २०२३ च्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळाफेकमधील एफ ४६ गटात १६.२१ मीटर गोळा फेकत सुवर्णपदक पटकावले. २०२४ च्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले. २०२२ मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतील सुवर्णपदकही त्याच्या नावावर आहे. क्रीडाक्षेत्रातील सचिनच्या या दैदीप्यमान कामागिरीने त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारताला ४० वर्षांनी पदक ..
सचिन खिलारी याने २०२४ च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्याच्या कामगिरीमुळे भारताला ४० वर्षांनंतर पदक मिळाले. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते.