व्यंकटेश माडगूळकरांची चौथी पिढी साहित्यक्षेत्रात, १३ वर्षाच्या पलोमाचा कवितासंग्रह होणार प्रकाशित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:54 IST2025-01-06T17:53:42+5:302025-01-06T17:54:00+5:30
लक्ष्मण सरगर आटपाडी : मराठी भाषेचे आधुनिक वाल्मीकी, थोर साहित्यिक गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर, थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची ...

व्यंकटेश माडगूळकरांची चौथी पिढी साहित्यक्षेत्रात, १३ वर्षाच्या पलोमाचा कवितासंग्रह होणार प्रकाशित
लक्ष्मण सरगर
आटपाडी : मराठी भाषेचे आधुनिक वाल्मीकी, थोर साहित्यिक गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर, थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची पणती पलोमा माडगूळकर यांचा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने माडगूळकरांच्या चौथ्या पिढीचे साहित्यात पदार्पण होत आहे.
महाकवी ग. दि. माडगूळकर व व्यंकटेश माडगूळकर यांनी मराठी साहित्यात मैलाचे दगड रचले. मराठी साहित्य रसिकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. माडगूळकरांच्या पुढच्या पिढ्यांनीही साहित्य, राजकारण, माहिती तंत्रज्ञान, अशा अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटविला.
गदिमांची चौथी पिढी आता साहित्य क्षेत्रात प्रवेश करते आहे व तेही वयाच्या १३ व्या वर्षी. ग. दि. मा., व्यंकटेशतात्यांच्या पणतीने अर्थात पलोमाने कमी वयात शासननियुक्त ग. दि. माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सादिक खाटिक यांनी साहित्य क्षेत्रात दमदार प्रवेश केल्याबद्दल पलोमाचे अभिनंदन केले आहे.
इंग्रजी काव्यसंग्रहाचे १९ रोजी प्रकाशन
पलोमा सुमित्र माडगूळकर हिच्या ‘द नॅसेंट ब्लॉसम’ म्हणजेच मराठीत ‘नवी पालवी/नवा बहर’ या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन येत्या १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवाजीनगर, पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या लता मंगेशकर हॉल येथे होत आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यावेळी शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन एकबोटे, इंग्रजी भाषा अभ्यासक विनया बापट उपस्थित राहणार आहेत.
माझिया रक्तात, ‘गदिमांचा’ अंश
पलोमाकडे गदिमा व तात्यांकडे असलेला चित्रकलेचा गुणही आला आहे. पलोमाने मराठी काव्य पाठांतर व हिंदी काव्य पाठांतर आंतरशालेय स्पर्धेत पुण्यात प्रथम पुरस्कार मिळवला आहे. माडगूळकर कुटुंबातील या नव्या पालवीचे मराठी रसिक प्रेमाने स्वागत करतील अशी आशा आहे. तिला प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. मोठ्या विनम्रपणे ती म्हणते “ज्ञानियाचा वा तुकयाचा, तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ‘गदिमांचा’ अंश आहे!”