सांगलीतील विटा येथे रंगल्या पालखी शर्यती, मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीचा प्रथम क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:06 IST2017-09-30T21:06:02+5:302017-09-30T21:06:20+5:30
सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने प्रथम क्रमांक पटकावला.

सांगलीतील विटा येथे रंगल्या पालखी शर्यती, मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीचा प्रथम क्रमांक
दिलीप मोहिते/विटा (सांगली) - सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने प्रथम क्रमांक पटकावला.
विटा येथे विजयादशमी निमित्त मुळस्थान श्री रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी 5 वाजता श्री काळेश्वर मंदिरापासून पालखी शर्यतीस सुरुवात झाली.
प्रारंभी गांधी चौकातून दोन्ही पालख्या खानापूर रोडवरील शिलंगण मैदानाकडे झेपावल्या. मात्र विटा बँकेसमोर दोन्ही बाजूच्या भाविकांनी पालख्या अडविण्याचा प्रयत्न करत असताना त्या पडल्या.
त्यातून सावरत विटा रेवणसिद्धची पालखी पुढे गेली. त्यानंतर मुळस्थानच्या पालखीने पुढे गेलेल्या पालखीला बसस्थानकच्या पुढे गाठले. खानापूर नाक्यावर विटा रेवणसिद्धची पालखी काही भाविकांनी रोखून धरल्याने पाठीमागून आलेल्या मुळस्थान रेवणसिद्ध देवाच्या पालखीने शिलंगण मैदानात धाव घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.
यावेळी श्री नाथबाबांच्या नावानं चांगभलं.. श्री रेवणसिद्ध देवाच्या नावानं चांगभलं.. चा गजर करीत भाविकांनी जल्लोष केला. त्यानंतर शिलंगण मैदानात उभा करण्यात आलेल्या वीस फूट उंचीच्या रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन सीमोल्लंघन करण्यात आले.
नेत्रदीपक पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. विजयादशमीचा हा सोहळा संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.