तब्बल चौदा वर्षांनी परदेशी पाहुण्यांचे आगमन; सांगलीत दलदलीत नकट्या बदकाचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 20:58 IST2019-12-23T20:54:50+5:302019-12-23T20:58:07+5:30
रविवारी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या अमोल जाधव, विशाल कुलकर्णी, नुपुरा कुलकर्णी, श्रद्धा लिमये, साक्षी करंदीकर यांना पन्नासहून अधिक स्थलांतरित पक्षी तेथे आढळले. त्यामध्ये नकट्या बदकाचे दर्शन आश्चर्याचा व आनंदाचा धक्का देणारे होते. दलदलीतील किड्यांवर मनसोक्त ताव मारताना तो दिसला.

तब्बल चौदा वर्षांनी परदेशी पाहुण्यांचे आगमन; सांगलीत दलदलीत नकट्या बदकाचा मुक्काम
सांगली : सांगलीत २००५ च्या महापुरावेळी आलेल्या दुर्मिळ पाहुण्याने सांगलीकरांना रविवारी पुन्हा दर्शन दिले. दुर्मिळ प्रजातींमध्ये मोडणारा नकटा बदक रविवारी (दि. २२) शारावनगरमधील दलदलीत दिसून आला. त्याच्या आगमनाने पक्षी निरीक्षकांत आनंदाची लाट पसरली.
यंदाच्या महापुरानंतर शहरातील अनेक भागात पाण्याची तळी निर्माण झाली. चार महिन्यांनंतरही अनेक ठिकाणी दलदल कायम आहे. पक्षी निरीक्षकांसाठी ती जणू तीर्थक्षेत्रेच बनली आहेत. हिवाळ्यात देशोदेशीचे अनेक पक्षी स्थलांतर करुन महाराष्ट्रात येताहेत. त्यातील काही सांगलीत दिसू लागले आहेत. विशेषत: शामरावनगरच्या दलदलीत पक्ष्यांचे रान चांगलेच फुलले आहे.
रविवारी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या अमोल जाधव, विशाल कुलकर्णी, नुपुरा कुलकर्णी, श्रद्धा लिमये, साक्षी करंदीकर यांना पन्नासहून अधिक स्थलांतरित पक्षी तेथे आढळले. त्यामध्ये नकट्या बदकाचे दर्शन आश्चर्याचा व आनंदाचा धक्का देणारे होते. दलदलीतील किड्यांवर मनसोक्त ताव मारताना तो दिसला. २००५ च्या महापुरावेळी सांगलीत तो दिसला होता, त्यानंतर गायब होता. पक्षी निरीक्षकांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला, पण तो बेपत्ताच होता. रविवारी अचानक त्याने आगमनाची वर्दी दिली. या तरुणांनी लागोपाठ फोटो क्लिक करुन त्याला सलामी दिली.
शराटी, करडा धोबी आणि भोरड्यादेखील
युरोपातून हजारो मैलांचा प्रवास करुन आलेला दलदली ससाणाही शामरावनगरच्या दलदलीत दिसला. काळ्या डोक्याचा शराटी, हिमालयातून आलेला चिमणीच्या आकाराचा करडा धोबी व चक्रवाक, सैबेरियातून आलेले भोरड्या, उघड्या चोचीचा करकोचाही दिसले. महापुरामुळे अनेक ठिकाणी नव्याने दलदल तयार झाली आहे. गवतही वाढल्याने कीटकांची पैदास खूप झाली आहे. त्यामुळे यंदा पक्षी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत, असे पक्षी निरीक्षकांनी सांगितले.
------