सांगली जिल्ह्यात ९३ हजारावर मुलींची सुकन्या खाती, पोस्टाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण
By अविनाश कोळी | Updated: January 23, 2025 16:04 IST2025-01-23T16:03:23+5:302025-01-23T16:04:27+5:30
लाडक्या लेकीच्या भविष्यासाठी

सांगली जिल्ह्यात ९३ हजारावर मुलींची सुकन्या खाती, पोस्टाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण
अविनाश कोळी
सांगली : मुलीच्या भवितव्याची चिंता नेहमीच पालकांना सतावत असते. मात्र, पोस्टाने पालकांना चिंतामुक्त करणारी ‘सुकन्या’ योजना आणल्यानंतर पालकांनी या योजनेत मोठी गुंतवणूक केली. योजनेला बुधवारी दहा वर्षे पूर्ण झाली असून जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कालावधीत एकूण ९३ हजार २३५ मुलींची खाती काढण्यात आली आहेत.
तुम्हीही मुलीचे वडील असाल आणि तुमच्या लेकीने भविष्यात आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे, अशी तुमची इच्छा असेल, तिला कधीही पैशाची अडचण येऊ नये, असे वाटत असेल तर तुम्हीही सरकारची या महत्त्वाकांक्षी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत गुंतवणूक केली तर तुमची मुलगी २१ वर्षात करोडपती होईल. तुम्हाला या योजनेत जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त या विशेष योजनेसाठी दररोज ४१६ रुपये वाचवावे लागतील.
दररोज ४१६ रुपयांची ही बचत नंतर तुमच्या मुलीसाठी ६५ लाख रुपयांची मोठी रक्कम मिळवून देईल. सुकन्या समृद्धी योजना ही अशी दीर्घकालीन योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याबद्दल खात्री बाळगू शकता.
..अशी आहे सुकन्या समृद्धी योजना
या योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षांनंतर आहे. मात्र, यामध्ये पालकांना फक्त १५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. उर्वरित वर्षभर व्याज चक्रवाढ होत राहते. या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. तसेच तुम्ही २५० रुपयांत खाते उघडू शकता.
लाडक्या लेकीच्या भविष्यासाठी
ही योजना खास तुमच्या लाडक्या मुलीसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेत तुम्ही अल्प रकमेमध्ये खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे थोडे थोडे पैसे जमा करु शकता.
मुलगी १० वर्षांची होण्याआधी काढावे लागते खाते
शून्य ते १० वर्षे वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ‘सुकन्या’ खाते उघडता येते. किमान १ हजार रुपये ठेवावे लागतात. १ वर्षात खात्यात कमाल १.५ लाख टाकता येतात.
खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी मुलीच्या लग्नासाठी किंवा १८ व्या वर्षी शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते. यास ७.६ टक्के व्याजदर आहे. महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली असून जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पालकांनी त्यांच्या कन्येच्या भवितव्यासाठी हे खाते उघडावे. अधिक माहितीसाठी पालकांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयास संपर्क साधावा. - रमेश पाटील, प्रवर डाक अधीक्षक, सांगली