सांगली जिल्ह्यात ५२ हजारांवर कुणबी दाखले; मिळाले किती.. जाणून घ्या
By संतोष भिसे | Updated: September 5, 2025 19:25 IST2025-09-05T19:25:39+5:302025-09-05T19:25:53+5:30
प्रस्ताव अडवले जात असल्याची तक्रार

सांगली जिल्ह्यात ५२ हजारांवर कुणबी दाखले; मिळाले किती.. जाणून घ्या
संतोष भिसे
सांगली : जिल्ह्यात ५२ हजारहून अधिक कुणबी नोंदी आजवर सापडल्या आहेत. त्यातून सुमारे ४५०० कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. अर्थात, प्रमाणपत्र मागणीचे प्रमाणही कमी आहे. आता हैदराबाद आणि सातारा गॅझेट अंमलात आल्यावर प्रमाणपत्रांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात सापडलेल्या सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर गावनिहाय अपलोड करण्यात आल्या आहेत. विविध तहसील कार्यालयांतही प्रदर्शित केल्या आहेत. लाभार्थ्यांनी आपल्या पूर्वजाचे नाव त्यात असल्याची खात्री करायची आहे. नाव असल्यास प्रमाणपत्रासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करायचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर किंवा तहसीलदार कार्यालयातील नोटीस फलकावर आपल्या पूर्वजाचे नाव कुणबी प्रवर्गात नोंद असल्याचे स्पष्ट झाल्यास स्थानिक सेतू कार्यालयामार्फत (महा-ई-सेवा) तहसीलदारांकडे जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल.
त्यासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा १९६७ पूर्वीचा जातीची नोंद असलेला पुरावा सोबत जोडावा लागेल. त्यामध्ये शाळेचा दाखला, जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला, न्यायालयीन किंवा अन्य कोणताही महसुली पुरावा ग्राह्य धरला जाईल. कुणबी म्हणून ज्याचे नाव सापडले आहे, त्याच्याशी वंशावळ सिद्ध करून दाखवावी लागेल. पुरावा म्हणून हेळव्याकडील वंशावळही ग्राह्य धरली जाईल. कुटुंबातील एका व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास रक्ताच्या नात्यातील अन्य सदस्यांनाही मिळेल. मात्र, त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. सोबत नात्यातील व्यक्तीला मिळालेले प्रमाणपत्र जोडावे लागेल.
प्रस्ताव अडवले जात असल्याची तक्रार
विविध तहसीलदार व प्रांत कार्यालयांत कुणबी प्रमाणपत्रांसाठीचे प्रस्ताव त्रुटी काढून प्रलंबित ठेवले जात असल्याची मराठा क्रांती मोर्चाची तक्रार आहे. आजवर ५२ हजार नोंदी सापडल्यानंतरही त्याच्या १० टक्केदेखील प्रमाणपत्रे वितरित झालेली नाहीत. कुणबी नोंदी शोधण्याची मोहीमही बंद आहे.
कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी दोन-दोन महिने लागत आहेत. त्रुटी काढून अर्ज प्रलंबित ठेवले जात आहेत. मराठवाड्यात आठवडाभरात प्रमाणपत्र मिळत असताना, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात मात्र महिना-दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाकडून मराठा समाजाच्या अडवणुकीचे धोरण राबविले जात असल्याची शंका वाटते. आता हैदराबाद, सातारा व औंध गॅझेट उपलब्ध झाल्यानंतर कुणबी नोंदी व प्रमाणपत्र वाढतील. मराठा समाजाने सजग राहून कुणबी प्रमाणपत्रांसाठी पाठपुरावा करावा. - डाॅ. संजय पाटील, मराठा क्रांती मोर्चा