सांगली जिल्ह्यातील अडीच लाखांवर शेतकऱ्यांकडे नाही ‘फार्मर आयडी’; विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार

By अशोक डोंबाळे | Updated: April 23, 2025 18:59 IST2025-04-23T18:59:41+5:302025-04-23T18:59:57+5:30

आता ‘फार्मर आयडी’ अनिवार्य 

Over 2 lakh farmers in Sangli district do not have Farmer ID will be deprived of various schemes | सांगली जिल्ह्यातील अडीच लाखांवर शेतकऱ्यांकडे नाही ‘फार्मर आयडी’; विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार

सांगली जिल्ह्यातील अडीच लाखांवर शेतकऱ्यांकडे नाही ‘फार्मर आयडी’; विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार

अशोक डोंबाळे

सांगली : केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’, तसेच राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळखपत्र) काढणे शेतकऱ्यांसाठी सक्तीचे आहे. जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ तीन लाख ३४ हजार ९९५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. उर्वरित जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.

‘फार्मर आयडी’ ही ओळख प्रणाली ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पाअंतर्गत विकसित केली आहे. शेतकऱ्यांची शेती, पीककर्ज, विमा योजना इत्यादींशी डिजिटल स्वरूपात जोडली जाणार आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. यापुढे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सहा लाखांवर शेतकऱ्यांपैकी तीन लाख ३४ हजार ९९५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. या शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे; पण जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीच काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी

तालुका - फार्मर आयडी असलेले

आटपाडी - २१६५८
जत - ६५११९
कडेगाव - २७५९६
क.महांकाळ - २६८६९
खानापूर - २०८६१
मिरज - ४१८७७
पलूस - २१२८७
शिराळा - २७२८७
तासगाव - ३६७४६
वाळवा - ४५७४८

आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया

शेतकऱ्यांनी फार्मर आयडी मिळवण्यासाठी आधारकार्ड, ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मोबाइल क्रमांक व गट क्रमांक सोबत ठेवावा. नोंदणीसाठी तलाठी, कृषी सहायक, सीएससी केंद्रचालक किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजे काय?

आधारप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ व त्यांच्या जमिनींसाठी ‘फार्म आयडी’ तयार करण्यात येणार आहे. दोन्ही आयडी आधारशी लिंक करून पीककर्ज, विमा आदी योजनांची कार्यप्रणाली सुलभ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तत्काळ काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

..तर लाभ होणार बंद?

पीएम किसान, नमो सन्मान या योजनांबरोबरच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी १५ एप्रिलपासून शासनाने फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे, हा आयडी काढला नसल्यास शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांसह पीएम किसान, नमो सन्मान योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी तो तातडीने काढून घ्यावा. अन्यथा विविध योजनांच्या लाभापासून मुकण्याची वेळ येऊ शकते. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

Web Title: Over 2 lakh farmers in Sangli district do not have Farmer ID will be deprived of various schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.