शिराळा नगरपंचायतसमोर विरोधकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:25+5:302021-06-23T04:18:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शहरात नाले सफाई, औषध फवारणी न झाल्याने नगरसेवक केदार नलवडे, अभिजित नाईक यांच्या नेतृत्वाखाली ...

Opposition sit-in agitation in front of Shirala Nagar Panchayat | शिराळा नगरपंचायतसमोर विरोधकांचे ठिय्या आंदोलन

शिराळा नगरपंचायतसमोर विरोधकांचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शहरात नाले सफाई, औषध फवारणी न झाल्याने नगरसेवक केदार नलवडे, अभिजित नाईक यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. नगरपंचायतच्या दारातच ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली. अखेर मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दोन दिवसात फवारणीसाठीचे औषध उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

विरोधी गटाचे नगरसेवक केदार नलवडे यांनी मुख्याधिकारी योगेश पाटील यांना औषध फवारणीबाबत निवेदन दिले होते. यामध्ये शहरात गेल्या दोन महिन्यांपासून रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली नाही. त्यामुळे साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे; मात्र नगरपंचायतीने याबाबत काहीच कार्यवाही केली नाही, उलट स्थायी समिती सभापती व नगराध्यक्षा सुनीता निकम यांनी निविदा रद्द केली. यामुळे विरोधी भाजप गटाच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर मुख्याधिकारी पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दोन दिवसांत औषध फवारणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात उत्तम डांगे, नेहा सूर्यवंशी, वैभव गायकवाड, सीमा कदम, राजेश्री यादव, उत्तम निकम, सचिन यादव, सचिन नलवडे आदींचा सहभाग होता.

चौकट

खाडाखोडमुळे निविदा रद्द

नगराध्यक्षा सुनीता निकम व उपनगराध्यक्ष विजय दळवी म्हणाले, निविदा प्रक्रियेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवकांचा कोणताही सहभाग नाही. ही प्रक्रिया होऊन दहा दिवस झाले. यातील अनेक निविदांमध्ये खाडाखोड, पाकिटावर काहीही मजकूर नाही, निविदा जादा दराने मंजूर केल्यामुळे सर्वच १९ प्रकारच्या निविदा स्थायी समितीने नामंजूर केल्या आहेत. नवीन प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा सर्वांसमक्ष उघडणार आहे. चुकीचे आरोप करणाऱ्यांनी प्रक्रिया आदी समजून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Opposition sit-in agitation in front of Shirala Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.