Sangli: जतमध्ये विरोध नेते एकत्र आले, हास्य रंगात रंगून गेले; विलासराव जगतापांच्या घरी चहापान कार्यक्रम
By अविनाश कोळी | Updated: December 18, 2023 19:03 IST2023-12-18T19:02:09+5:302023-12-18T19:03:41+5:30
कार्यकर्ते झुंज खेळत असताना नेत्यांनी राजकीय वैरत्व बाजुला ठेवून गळ्यात गळे घातले

Sangli: जतमध्ये विरोध नेते एकत्र आले, हास्य रंगात रंगून गेले; विलासराव जगतापांच्या घरी चहापान कार्यक्रम
जत : भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप हे पक्षातीलच खासदार संजय पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर व विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्यावर सतत टीका करत असतात. मात्र, त्यांच्याच घरी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास हे सारे नेते हास्य रंगात रंगून गेले.
माडग्याळ येथील पाणी पूजनाच्या कार्यक्रमास जाण्यापूर्वी खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, गोपीचंद पडळकर व विक्रमसिंह सावंत यांचे एकत्र चहापान झाले. यात गप्पाही रंगल्या होत्या. मात्र, या गप्पांचे हे क्षण काही कार्यकर्त्यांनी टिपले व ते सोशल मिडियावर दिले. ‘बघा, नेतेमंडळी एकत्रच असतात, आम्ही मात्र त्यांच्यासाठी भांडत असतो’ असे वाक्यही त्याखाली टाकण्यात आले होते.
माडग्याळच्या पाण्याचा श्रेयवाद विकोपाला पोहोचला होता. भाजप-काँग्रेस कार्यकर्ते सोशल मिडियात भिडले होते. त्यामुळे कार्यक्रमात राडा होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, झाले वेगळेच. माजी आमदार विलासराव जगताप हे भाजप नेते असले तरी त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय पाटील, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी बिनसले आहे. ते माडग्याळला जाण्यापूर्वी पाटील, पडळकर व विक्रमसिंह सावंत थेट विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी पोहोचले. नाष्टा केला. इकडे कार्यकर्ते बाह्या सरसावून बसले असताना नेत्यांनी प्रेमाचे लाडू खाल्ले. कार्यकर्ते झुंज खेळत असताना नेत्यांनी राजकीय वैरत्व बाजुला ठेवून गळ्यात गळे घातले.