Sangli: थकीत पगार बिलासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी, मिरजेत शिक्षक अन् लिपिकाला अटक
By घनशाम नवाथे | Updated: December 30, 2024 19:32 IST2024-12-30T19:31:15+5:302024-12-30T19:32:28+5:30
सांगली : महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची १९ लाखांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी सहा टक्के याप्रमाणे १ लाख १० हजार ...

Sangli: थकीत पगार बिलासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी, मिरजेत शिक्षक अन् लिपिकाला अटक
सांगली : महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची १९ लाखांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी सहा टक्के याप्रमाणे १ लाख १० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी मिरजेतील हिंद एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक उमेश मारुती बोरकर, (वय ३६, रा. यादव गल्ली, कवठे एकंद, ता. मिरज) व कनिष्ठ लिपिक युवराज मनोहर कांबळे (वय ५६, रा. बौद्ध वसाहत, बेडग, ता. मिरज) याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दोघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, तक्रारदार यांची पत्नी सांगलीतील दोन महाविद्यालयांत संस्कृत विषय शिकविण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. दोन्ही आस्थापनांकडील सुमारे दोन वर्षांचे एकूण १९ लाख ४५ हजार ७१० रुपये येणे बाकी होती. एकूण तीन पगार बिले दोन्ही कॉलेज प्रशासनाने मंजुरीसाठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील पे युनिट कार्यालयाकडे पाठवली होती. तक्रारदार यांच्या पत्नी या थकीत बिलासाठी पाठपुरावा करत असताना उमेश बोरकर याने सहा टक्के लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दि. १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. तक्रारीनुसार दि. २८ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली.
हिंद एज्युकेशन सोसायटीचा नरवाड येथील शिक्षक उमेश बोरकर याने थकीत बिलाची रक्कम अधीक्षक करमुसे व लिपिक मंडले यांना सांगून मंजूर करून आणतो, असे सांगितले. त्यासाठी थकीत बिलाच्या सहा टक्केप्रमाणे १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तर हिंद एज्युकेशनच्या न्यू इंग्लिश स्कूल सोनी येथील कनिष्ठ लिपिक युवराज कांबळे याने या लाचेच्या मागणीवेळी उपस्थित राहून तक्रारदार यांनी लाच द्यावी म्हणून प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
उमेश बोरकर व युवराज कांबळे यांनी १ लाख १० हजारांची लाच मागितली. परंतु, लाच स्वीकारली नव्हती. त्यामुळे लाचेच्या मागणीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला. तेथून परवानगी मिळाल्यानंतर बोरकर व कांबळे याला अटक करून विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोर खाडे, पोलिस अंमलदार सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, पोपट पाटील, सलीम मकानदार, अतुल मोरे, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, विठ्ठल रजपूत यांच्या पथकाने कारवाई केली.