टीईटी अनुत्तीर्ण दीड हजार शिक्षकांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:57+5:302021-06-30T04:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या आदेशाचा सांगली जिल्ह्यात दीड हजार शिक्षकांना फटका ...

टीईटी अनुत्तीर्ण दीड हजार शिक्षकांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या आदेशाचा सांगली जिल्ह्यात दीड हजार शिक्षकांना फटका बसणार आहे. गुणवत्ता नसल्याच्या कारणास्तव त्यांची नोकरी संपुष्टात येण्याची भीती आहे.
उच्च न्यायालयाने नुकतेच एका आदेशाद्वारे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना शिक्षक म्हणून काम करण्यास अपात्र ठरवले आहे. स्वत: गुणवत्तापूर्ण नसाल तर विद्यार्थ्यांना कसे घडवणार, असा न्यायालयाचा सवाल आहे. यासंदर्भातील शिक्षक व शिक्षक संघटनांच्या तब्बल ८९ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. अर्थात या निर्णयाला पुन्हा कायदेशीर आव्हान दिले गेले असले तरी यामुळे टीईटी नसणारे शिक्षक हादरले आहेत. सांगली जिल्ह्यात सुमारे दीड हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची भीती आहे. या शिक्षकांना वारंवार संधी मिळूनही ते टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत.
२०१४ मध्ये शिक्षक म्हणून नोकरीस लागलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे शक्तीचे आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम खडतर असल्याने निकाल अवघा दोन ते चार टक्के लागतो. या कठीण परीक्षेला अनेक शिक्षक सामोरे जाऊ शकत नाहीत. अनेकदा परीक्षेला बसूनही ते गुणवत्ता सिद्ध करू शकलेले नाहीत. यावर शिक्षक, शिक्षक संघटना व बेरोजगार तरुणांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
बॉक्स
शिक्षक संघटना म्हणतात, संधी द्या
शिक्षक गुणवत्तापूर्ण असलाच पाहिजे याविषयी दुमत नाही; पण गुणवत्तेसाठी पुरेशी संधीदेखील मिळाली पाहिजे. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना नोकरीवरून कमी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले, तरी त्यांना आणखी एक संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे. अनेक शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसले तरी आपापल्या विषयात अत्यंत पारंगत आहेत. त्यांना नोकरीवरून कमी केल्यास शिक्षक व विद्यार्थी या दोहोंचे नुकसान होईल.
- राजेंद्र नागरगोजे, पुणे विभागीय अध्यक्ष, शिक्षक परिषद.
टीईटी उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशा संधी मिळायला हव्यात. २०१४ पासूनच्या शिक्षकांना हा निर्णय लागू असल्याने फार मोठ्या संख्येने शिक्षक कमी होणार नाहीत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पुन्हा आव्हान दिलेले असल्याने न्यायालयात योग्य तो निर्णय होईल, असा विश्वास आहे. एकूण शिक्षक गुणवत्तापूर्ण असलाच पाहिजे हे महत्त्वाचेच आहे.
- बाळासाहेब कटारे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद
शिक्षकांविषयीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला काही शिक्षक व संघटनांनी पुन्हा कायदेशीर आव्हान दिले आहे. तेथे निश्चित शिक्षकांचे म्हणणे मान्य केले जाईल, अशी अपेक्षा आहे. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना परीक्षेची आणखी एक संधी शासनाने द्यायला हवी. त्यासाठी आम्हीही पाठपुरावा करू. परीक्षा अनुत्तीर्णतेच्या तांत्रिक कारणाने त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येऊ नये, अशी अपेक्षा आहे.
- नितेंद्रकुमार जाधव, महापालिका क्षेत्र अध्यक्ष, शिक्षक परिषद
टीईटी उत्तीर्ण बेरोजगार म्हणतात...
शैक्षणिक क्षेत्रात पात्र भरती होणे गरजेचे आहे. म्हणून टीईटी अपात्र शिक्षकांच्या सेवा तातडीने रद्द कराव्यात. परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या व संधीसाठी झटत असलेल्या शिक्षकांना अध्यापनासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळण्यासाठी रखडलेली टेट परीक्षाही लवकरात लवकर घेण्यात यावी, जेणेकरून त्यांची वयोमर्यादा संपणार नाही. जास्तीत जास्त कालावधीसाठी अध्यापनही करता येईल. यानिमित्ताने नोकरीच्या प्रतीक्षेतील पात्र शिक्षकांचा सन्मान होईल.
स्वप्नप्रीती हारुगडे, सांगली
आजही बहुतांश शैक्षणिक संस्थामध्ये टीईटी अपात्र शिक्षक अध्यापन करत आहेत. परिणामी, पात्र उमेदवार अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत अपात्र उमेदवारांची सेवा रद्द करून पात्र उमेदवारांना संधी देणे गरजेचे आहे. टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी फक्त प्रमाणपत्रावर उत्तीर्ण न राहता त्यांच्या उत्तीर्ण होण्याचा सन्मान होणे अपेक्षित आहे. २०१७ मधील अभियोग्यता परीक्षेनंतर रखडलेली दुसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा तातडीने घेऊन पात्र उमेदवारांना संधी मिळायला हवी.
-निशा मुळे, सांगली
विद्यार्थी गुणवत्तापूर्ण घडायचे तर त्यासाठी स्वत: शिक्षक परिपूर्ण असायला हवा. स्वत: शिक्षक म्हणून काम करताना त्याने पात्रताही सिद्ध केली पाहिजे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसेल तर असा शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार? असा प्रश्न आहे. अशा शिक्षकांना शासनाने तातडीने कार्यमुक्त केले पाहिजे. टीईटी उत्तीर्ण झालेले पात्र उमेदवार शिक्षक म्हणून नियुक्त केले पाहिजेत. यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचाही मान राखला जाईल.
- प्रा. अर्जुन सूरपल्ली, अध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघर्ष समिती
ग्राफ
जिल्ह्यातील एकूण शिक्षक - १४,४१२
अनुदानित शाळांतील शिक्षक - ११७२७
विनाअनुदानित शाळांतील शिक्षक - १४८५
कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक - १२००