सांगलीच्या एसटी विभागाला विठूराया पावला! उत्पन्नात किती झाली वाढ.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:43 IST2025-07-11T17:43:32+5:302025-07-11T17:43:52+5:30
यात्रा कालावधीत ४०० बस सोडल्या

सांगलीच्या एसटी विभागाला विठूराया पावला! उत्पन्नात किती झाली वाढ.. वाचा सविस्तर
प्रसाद माळी
सांगली : आषाढी वारीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा एसटी सोडण्याचे नियोजन करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. सांगली विभागातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी आषाढी यात्रा कालावधीसाठी ४०० बसेस सोडण्यात आल्या. या बसेसच्या माध्यमातून विभागाने तब्बल ८० लाख ८४ हजार ६१९ रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. मागील वर्षापेक्षा यंदा तब्बल चार लाख ४० हजार ७८९ रुपयांचे जादाचे उत्पन्न विभागाने गोळा केले आहे. त्यामुळे यंदा वारकऱ्यांच्या प्रतिसादाने सांगली विभागाला विठूराया पावला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीच्या सांगली विभागाने १ जुलै ते ८ जुलै या यात्रा काळाच्या दरम्यान ४०० विशेष बस सोडल्या. या ४०० बसेसद्वारे ८६० फेऱ्या करण्यात आल्या असून, त्यांचे एक लाख ४९ हजार ३८४ इतके किलोमीटर झाले आहे. याद्वारे विभागाने ८० लाख ८४ हजार ६१९ रुपयांचे उत्पन्न मिळवले. मागील वर्षी ३८० बसेसच्या माध्यमातून एसटीने ७६ लाख ७३ हजार ८४० रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सांगली विभागाने चार लाख ४० हजार ७८९ रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळवले आहे.
वारकऱ्यांसह आषाढी एकादशीदिनी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनी पुन्हा एकदा एसटीच्या सुरक्षित प्रवासावर विश्वास ठेवल्याचे दिसून आले. एसटीकडून सुरू असलेल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास व महिलांसाठी ५० टक्क्यांची सवलत याचाही लाभ एसटीला चांगल्या प्रकारे मिळाला आहे.
सांगली विभागातील विविध आगारांतून सोडण्यात आलेल्या बसेस व मिळवलेले उत्पन्न
आगार / सोडलेल्या बसेस / मिळालेले उत्पन्न लाखात
सांगली / ५० / ८४३७८३
मिरज / ४७ / ७८७००५
इस्लामपूर / ४३ / ९६५२१८
तासगाव / ६० / ९९९०९६
विटा/ २६/ ५३७४५३
जत / २४/ ५०९२७०
आटपाडी / ४७/ १३२७९७८
कवठेमहांकाळ / ३२/ ५६२०६२
शिराळा / ३८ / ७३१८३५
पलूस / ३१/ ८१७९२०
यात्रा कालावधीत सांगली विभागातील विविध आगारांतून पंढरपूरसाठी ४०० बसेस सोडण्यात आल्या. याचा लाभ भाविक व वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला. विविध योजना आणि सवलतींमुळे एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला व त्याचे रूपांतर चांगले व भरघोस उत्पन्न मिळण्यात झाले आहे. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली