घरमालक, उद्योजकांवर गुन्हे
By Admin | Updated: January 25, 2015 00:42 IST2015-01-25T00:42:11+5:302015-01-25T00:42:11+5:30
कुपवाडमध्ये कारवाई : भाडेकरुंची माहिती लपविली

घरमालक, उद्योजकांवर गुन्हे
कुपवाड : घरातील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास कळविली नाही म्हणून शहर व परिसरातील अकरा घरमालकांबरोबरच दोन उद्योजकांवर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.
गुन्हे दाखल झालेल्या घरमालकांमध्ये संजय नारायण शिंदे (रा. श्रीनगर, कुपवाड), रमजान बंदेनवाज मुलाणी (रा. स्वामी मळा, कुपवाड), आण्णाप्पा सिध्दू आवटी, महादेव रामचंद्र काळे, अण्णासाहेब बापू घोडके (तिघेही रा. दत्तनगर, बामणोली), सुरेश गणपती पांडेकर (रा. आंबा चौक, कुपवाड), सत्यवान आबा कोळेकर (रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, कुपवाड), सिध्दू गोपाळ बंडगर, रघुनाथ हरिबा कराळे (दोघेही रा. सावळी), गजानन श्रीकांत लाड (रा. अहिल्यानगर, कुपवाड), अलतरबी मुसा मुल्ला (रा. खारे मळा, कुपवाड) यांचा समावेश आहे, तर उद्योजकांमध्ये रावसाहेब केदारी माळी (तारा इंडस्ट्रीज, मिरज एमआयडीसी), परेश चंपकलाल शहा आणि विपूल चंपकलाल शहा (योगी कार्पोरेशन, एमआयडीसी कुपवाड) यांचा समावेश आहे.
उद्योजकांवर कामगारांची माहिती न दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी शहर व परिसरातील पन्नास सार्वजनिक ठिकाणी आदेशाच्या प्रती भिंतीवर चिकटविल्या होत्या. याप्रकरणी कुपवाड पोलिसांची विशेष पथकेही तैनात झाली आहेत. याबाबत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
मोहीम तीव्र करणार : संजय मेंढे
परिसरातील घरमालकांनी आणि औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार त्वरित भाडेकरु व कामगारांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसू शकेल. घरमालक किंवा कारखानदार माहिती देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम आणखी तीव्र करणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.