वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्या लवकरच कमी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:10+5:302021-07-05T04:17:10+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोणीही घाबरून जाऊ नये. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने बाधित ...

वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्या लवकरच कमी होईल
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोणीही घाबरून जाऊ नये. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने बाधित रुग्ण निष्पन्न होत आहेत. या सर्वांवर वेळीच उपचार होत आहेत. लवकरच रुग्णांचे प्रमाण कमी होईल. सर्वांनी एकत्र येऊन कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केल्यास निश्चित यश मिळेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरून व्यक्त केला.
ते म्हणाले, गेल्या काही दिवसात वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. म्हणून मागील काही दिवसांपासून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. काल इस्लामपूर येथेही प्रत्यक्षात आढावा बैठक घेतली.
पाटील म्हणाले, तालुक्यातील विलगीकरण कक्ष वाढवण्यासह चाचण्या वाढण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आधी जवळपास ८०० चाचण्या होत होत्या. आता त्याची संख्या २००० पर्यंत गेली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आला आहे. मागील काही दिवसात साटपेवाडी, बोरगावमधील शिवाजीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळल्यानंतर या भागात राहणाऱ्या सर्वच नागरिकांच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यामुळे पुढील संसर्गास आळा बसेल.
ते म्हणाले, कोरोनाचे निदान लवकर झाले तर रुग्णांवर लवकरच उपचार करता येतात. त्यामुळे जास्त चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाला गांभीर्याने घेतले पाहिजे .सर्वांनी सूचनांचे पालन केले तर ही परिस्थिती आटोक्यात येईल.
चौकट
नियम पाळा..!
जयंत पाटील म्हणाले, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वांना एकत्र प्रयत्न करायला हवा, मला विश्वास आहे की आपल्याला यश मिळेलच. सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, अनावश्यक गर्दी टाळावी आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे.