तेरा दुष्काळी तालुक्यांतील कामे पूर्ण होण्यासाठी आता संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:21+5:302021-06-27T04:18:21+5:30

महेंद्र किणीकर लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : नागनाथअण्णा आटपाडीला आले नसते तर तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले नसते. कोणाच्या ...

Now struggle to complete the works in thirteen drought-hit talukas | तेरा दुष्काळी तालुक्यांतील कामे पूर्ण होण्यासाठी आता संघर्ष

तेरा दुष्काळी तालुक्यांतील कामे पूर्ण होण्यासाठी आता संघर्ष

महेंद्र किणीकर

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : नागनाथअण्णा आटपाडीला आले नसते तर तेरा दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले नसते. कोणाच्या तरी पत्राने किंवा दौऱ्यांमुळे पाणी आलेले नाही, दोन पिढ्यांना खस्ता खाव्या लागल्या आहेत. आता अपू्र्ण कामांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन आटपाडी पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.

शनिवारी आयोजित ऑनलाईन परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सांगोला, मंगळवेढ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. काही गावे अद्याप वंचित आहेत. जनतेच्या ताकदीपुढे शासनाला नमावेच लागेल, कामे पूर्ण करावी लागतील. २९ वर्षांपूर्वी कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात आणायचे हे स्वप्न होते. हुतात्मा कारखान्याने सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जागृत व संघटित केले. शासनाला धडकी भरवणारी आंदोलने केली, त्यामुळेच पाणी खळाळू लागले आहे.

ते म्हणाले, पाण्यापासून वंचित असणाऱ्या उर्वरित भागासाठी आता संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय नागनाथअण्णांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी अखंड लढ्याशिवाय पर्याय नाही. १५ जुलैपासून अण्णांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होताहेत. १३ दुष्काळी तालुक्यांतही अनेक कार्यक्रम होतील.

प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, दुष्काळी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील कामांचा आढावा वैभव नायकवडी व गणपतराव देशमुख यांना पाठवावा. त्यानंतर अपूर्ण कामांच्या पूर्णतेसाठी पाठपुरावा करता येईल.

यावेळी प्राचार्य आर. एस. चोपडे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, लोणंदचे सर्फराज बागवान, शेटफळेचे चंद्रकांत गायकवाड, ॲड. सुभाष पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. दादासाहेब ढेरे यांनीही मार्गदर्शन केले.

चौकट

विरोधक नारळ फोडत सुटलेत

माजी आमदार गणपतराव देशमुख प्रकृती अस्वास्थ्यामुळे परिषदेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख म्हणाले, पाणी मंगळवेढ्यात पोहोचले आहे, सर्वत्र पोहोचण्यासाठी लढा द्यावा लागेल. या योजनेतील शुक्राचार्य आता नारळ फोडत पाणी आम्हीच आणल्याचे सांगत सुटले आहेत.

चौकट

‘टेंभू’ला नागनाथअण्णांचे नाव द्या

दुष्काळी भागात पाणी म्हणजे राजकारण असल्याचा संभ्रम दुष्काळी भागात होता. तो फोल ठरून आज सर्वत्र पाणी पोहोचले आहे. नागनाथ अण्णांचीची चळवळ विस्मरणात जाऊ नये, म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात टेंभू योजनेला अण्णांचे नाव देण्याची मागणी परिषदेत झाली.

Web Title: Now struggle to complete the works in thirteen drought-hit talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.