Sangli: ताकारी योजनेची पाणीपट्टी चुकवणाऱ्या २५० शेतकऱ्यांना नोटीस
By हणमंत पाटील | Updated: June 25, 2024 18:29 IST2024-06-25T18:29:06+5:302024-06-25T18:29:24+5:30
सात-बारावर बोजा चढणार; ताकारी योजनेचा वसुली विभाग ॲक्शन मोडवर

Sangli: ताकारी योजनेची पाणीपट्टी चुकवणाऱ्या २५० शेतकऱ्यांना नोटीस
अतुल जाधव
देवराष्ट्रे : ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांना ऊस घालवून ताकारी योजनेची पाणीपट्टी भरलेली नाही, अशा २५० शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या वसुली विभागाने वसुलीच्या नोटीस काढल्या आहेत. ताकारी योजनेचा वसुली विभाग पाणीपट्टी मुद्दामहून चुकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात ॲक्शन मोडवर आहे. सातबारावर बोजा चढविण्याचीही तयारी केली आहे.
ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या परिसरातील सोनहिरा, कृष्णा, क्रांती, उदगिरी, वसंतदादा, हुतात्मा, राजारामबापू या कारखान्यांना ऊस ज्या शेतकऱ्यांनी पाठवला आहे. त्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी ताकारी योजनाला परस्पर कारखान्याच्या माध्यमातून जमा झाली आहे; मात्र ताकारी योजनेची पाणीपट्टी भरायची नाही, ती चुकवायची हा दृष्टिकोन ठेवून ज्या शेतकऱ्यांनी गेटकेनच्या माध्यमातून इतर कारखान्यांना म्हणजेच दालमिया शुगर, उगार शुगर, सह्याद्री कारखाना, अथणी शुगर रयत युनिट, विराज शुगर, केन ॲग्रो रायगाव, ग्रीन पॉवर गोपुज कारखान्याला ऊस घालवला आहे;
मात्र या कारखान्यांनी या शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुली करून ती ताकारी योजनेकडे जमा केलेली नाही. त्यामुळे योजनेचा लाखो रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली नाही, ती पाणीपट्टी वसूल करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्यांना ऊस घालवला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजेच २५० शेतकऱ्यांना पाणीपट्टी वसुलीची नोटीस बजावली आहे. ती पाणीपट्टीची वसुली शेतकऱ्यांनी तत्काळ ताकारी योजनेच्या कार्यालयात आणून न भरल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावर पाणीपट्टीचा बोजा चढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यादी नसल्याने वसुलीला अडचणी..
पाणीपट्टी वसुलीसाठी गेटकेनचे कारखाने व कार्यक्षेत्रातील कारखाने वसुलीसाठी सहकार्य करीत आहेत; मात्र ग्रीन पॉवर गोपुज, केन ॲग्रो रायगाव यांनी अजूनही शेतकऱ्यांची वसुली यादी दिली नसल्याने वसुलीला अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.