Notice to Duffalapur Medical Officers | डफळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस
डफळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

ठळक मुद्देडफळापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

सांगली : डफळापूर (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्याऐवजी मिरजेला नेण्याचा सल्ला देणारे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.

मिरजेला जाताना संबंधित महिलेची डफळापूरच्या बसथांब्यावरच प्रसूती झाली होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई का करू नये, अशी विचारणाही डॉ. चोथे यांच्याकडे करण्यात आली आहे.

डफळापूरपासून दहा किलोमीटरवरील खेड्यात राहणाऱ्या महिलेस सोमवारी प्रसूती कळा सुरू होत्या. सकाळी अकराच्या सुमारास ती पती व लहान मुलासोबत डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होती. दरम्यान, तिची अवस्था पाहून परिचारिकेने केसपेपर काढून दिला. केसपेपर घेऊन ती गर्दीतून वाट काढत डॉ. अभिजित चोथे यांच्या केबिनमध्ये गेली.

चोथे यांनी तिची तपासणी करून इथे प्रसूती करता येणार नाही, तुम्ही मिरजेला जा, असा सल्ला दिला. रुग्णालयाची गाडी पंधरा दिवसांपासून बंद आहे, असे सांगून तिला मिरजेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी टाळण्यात आली.

संबंधित महिला पायीच बसथांब्याकडे गेली. तेथे ती बसची वाट बघत प्रसूतीकळा सहन करीत बसून होती. तासाभरानंतर वेदना असह्य झाल्याने ती ओरडू लागली. तिची अवस्था पाहून बरोबर असलेला मुलगाही आरडाओरड करू लागला.

पती बसथांब्यावर फिरू लागला. हा गोंधळ ऐकून बघ्यांची गर्दी वाढली. काही महिला मदतीसाठी पुढे सरसावल्या. गर्दीत एक परिचारिकाही होती. तिने पुढाकार घेतला आणि या गर्दीतच संबंधित महिला प्रसूत होऊन जुळी मुले जन्माला आली.

काहीं वेळानंतर रुग्णवाहिका बसथांब्यावर आली. यानंतर पुन्हा संबंधित महिलेला डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. डॉ. चोथे यांनी वेळेत योग्य सल्ला व सेवा दिला नाही.

संबंधित महिलेच्या जिवावर बेतण्याची वेळ आली. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉ. चोथे यांना निलंबित का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे डॉ. गिरीगोसावी यांनी सांगितले.


Web Title: Notice to Duffalapur Medical Officers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.