ट्युलीप नव्हे... ही तर चक्क जलपर्णी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:00+5:302021-09-05T04:30:00+5:30

पावसाळ्यात जिल्हाभरात असे रंगीबेरंगी कंद विक्रीसाठी आले आहेत. कमळ किंवा ट्युलीपचे म्हणून त्यांची विक्री केली जाते. संतोष भिसे लोकमत ...

Not a tulip ... it's a water hyacinth! | ट्युलीप नव्हे... ही तर चक्क जलपर्णी!

ट्युलीप नव्हे... ही तर चक्क जलपर्णी!

पावसाळ्यात जिल्हाभरात असे रंगीबेरंगी कंद विक्रीसाठी आले आहेत. कमळ किंवा ट्युलीपचे म्हणून त्यांची विक्री केली जाते.

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पावसाळा सुरू झाला की हौशी बागप्रेमींच्या उत्साहाला बहर येतो. रस्तोरस्ती रंगीबेरंगी फूलझाडांचे सेल लागतात; पण खरेदीवेळी जरा सावधान, असा इशारा निसर्ग अभ्यासकांनी दिला आहे.

सांगली-मिरज रस्त्यावर प्लास्टिकच्या बादलीत विक्रीसाठी ठेवलेले कंद दिसतात. ट्युलीप किंवा विविधरंगी कमळ म्हणून याची विक्री होते. पन्नासला एक किंवा शंभरला तीन मिळतात. अतिशय सुंदर, रंगीबेरंगी आणि कोवळे कंद पाहून बागप्रेमी हरखून जातात. कुंडीत लावल्यानंतर महिन्या-दोन महिन्यांनी निळी-जांभळी फुलेही लागतात. त्यावेळी तो ट्युलीप किंवा कमळ नसून, जलपर्णी असल्याचे स्पष्ट होते. तोपर्यंत विक्रेते आणि बागकामाची हौस दोन्ही गायब झालेले असतात. वैतागून रोपे उपटून गटारीत फेकली जातात. चिवट जलपर्णी नाल्यांमध्ये पसरते. नदीपात्रावरही फैलावते.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात फूलझाडे, फळझाडे, नारळाची रोपे विक्रीला ठेवलेली असतात. विशेषत: आंध्र प्रदेशातील विक्रेते मोठ्या संख्येने नारळाची रोपे घेऊन येतात. २०० ते ४०० रुपयांना विक्री होते. आंध्रच्या समुद्रकिनारी दमट हवामानात वाढलेली रोपे सांगलीत कृष्णाकाठच्या थंड वातावरणात टिकत नाहीत. फूलझाडे खरेदीवेळी फुलांनी डवरलेली दिसतात, पण घरात कुंडीत लावल्यानंतर महिन्याभरातच वाळतात. त्यांना फुलेही लागत नाहीत.

चाैकट

शेवंती, निशिगंधावर स्टेरॉईडची फवारणी

शेवंतीला सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान बहर येतो, पण पैसे मिळविण्यासाठी त्यांना कृत्रिमरित्या फुलवले जाते, त्यासाठी चक्क स्टेरॉईडची फवारणी केली जाते. निशिगंधावरही स्टेरॉईडचा वापर होतो. त्यामुळे अवेळी आलेली फळे, फुले किंवा रोपे नाकारणेच योग्य ठरते.

कोट

ट्युलीप म्हणून खरेदी केलेली जलपर्णी फेकून देऊ नका. ती मुळासह संपूर्ण नष्ट करा. अन्यथा फैलाव होऊन गटारी तुंबतात. नदीत केंदाळ पसरते. फूलझाडे किंवा फळझाडे अधिकृत नर्सरीमधूनच खरेदी करावीत.

- अमोल जाधव, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, सांगली

Web Title: Not a tulip ... it's a water hyacinth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.