सदानंद औंधेमिरज : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तपासणीत (एनएमसी) राज्यातील ३० वैद्यकीयमहाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळले. यामध्ये मिरज येथील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचाही समावेश आहे. शैक्षणिक सुविधांच्या अभावाबाबत मिरज वैद्यकीय महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.एनएमसीचे पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळ (यूजीएमईबी) नवीन शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांचे वार्षिक नूतनीकरणाची प्रक्रिया राबविते. या मूल्यांकन प्रक्रियेत वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांची संख्या, वैद्यकीय निकषावर पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात येते. या मूल्यांकनात राज्यातील ३० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अपुरी संख्या, वैद्यकीय सोयी-सुविधा व पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मिरजेसह इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.मिरज वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या पाच वर्षात १०० विद्यार्थी क्षमता वाढवून १५० व नंतर दोनशेपर्यंत नेण्यात आली आहे. गतवर्षी मान्यता मिळालेल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना, बुलढाणा व भंडारा या महाविद्यालयातही शैक्षणिक सुविधांचा अभाव आढळला आहे. या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील अपुऱ्या सुविधांबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व संचालकांना याबाबत विचारणा केली आहे.
शिक्षकांची २३ टक्के पदे रिक्तमिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या दोनशे जागा असून प्राध्यापक व शिक्षकांची २३ टक्के पदे भरली नाहीत. येथे १५३ प्राध्यापकांची आवश्यक असताना १४० पदे कार्यरत आहेत. २७० निवासी डॉक्टर, ४१५ परिचारिका व पाचशे खाटांचे हॉस्पिटल उपलब्ध आहे.
मिरजेत वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढल्या असताना शिक्षक व प्राध्यापकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. काही विषयांचे शिक्षक मिळत नसल्याने ती पदे रिक्त आहेत. आता राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यात येणार असून काही जणांना पदोन्नती देण्यात येणार आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध. - डॉ. प्रकाश गुरव, अधिष्ठाता