शिराळे खुर्दला नवविवाहित तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:26 IST2021-05-24T04:26:05+5:302021-05-24T04:26:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील संतोष आनंदा खाडे (वय ३०) याने खाडे वस्तीवरील घरात ...

शिराळे खुर्दला नवविवाहित तरुणाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील संतोष आनंदा खाडे (वय ३०) याने खाडे वस्तीवरील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. एका महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
संतोष खाडे पत्नी, वडील व भाऊ यांच्यासमवेत शिराळे खुर्द गावाच्या पूर्वेस असलेल्या खाडे वस्ती नावाच्या शेतातील घरात राहात होता. महिन्यापूर्वी संतोषचे लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरी गेली होती. सकाळी दहाच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून संतोषने घराच्या सोप्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याचे वडील गावात, तर भाऊ कामधंद्यासाठी बाहेर गेला होता. वडील गावातून परत आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. संतोषच्या पश्चात पत्नी, वडील, लहान भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. संतोषचे घर शेतात अर्धा किलोमीटर आत अडचणीत आहे. सरपंच किरण पाटील, लक्ष्मण पाटील, भीमराव कदम, कृष्णदेव खाडे, सुनील पाटील, प्रदीप पाटील आदींनी संतोषचा मृतदेह घरापासून मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी मदत केली.
चौकट -
महिन्याभरात संसार उद्ध्वस्त
संतोषच्या आईचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या घरात कोणीही बाईमाणूस नव्हते. त्यामुळे संतोषने एक महिन्यांपूर्वी लग्न केले होते. संसाराची नुसती सुरुवात झालेली असतानाच, त्याने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.